Kartik Purnima 2025 :हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. ही तिथी कार्तिक महिन्यातील शेवटची तिथी असते. तसेच, कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देव दिवाळी असं देखील म्हणतात. या दिवशी पवित्र नदीत स्नान, दान आणि दीपदान करण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक पौर्णिमा (देव दिवाळी) नेमकी कधी या संदर्भात संभ्रम निर्माण होतो.
कार्तिक पौर्णिमा 4 की 5 नोव्हेंबर असा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण झाला असेल तर याच संदर्भात कार्तिक पौर्णिमा कधी, त्याचा शुभ मुहूर्त आणि कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व नेमकं काय ते जाणून घेऊयात. कार्तिक पौर्णिमा कधी? (When Is Kartik Purnima?) कार्तिक पौर्णिमा तिथीची सुरुवात 4 नोव्हेंबर (मंगळवार) 2025 रोजी रात्री 10 वाजून 26 मिनिटांनी सुरु होईल. तर, या तिथीची समाप्ती 5 नोव्हेंबर (बुधवारी) रात्री 8 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे. मात्र, पौर्णिमा तिथीचा उदय 5 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार, कार्तिक पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दान 5 नोव्हेंब 2025 रोजी केलं जाईल.
कार्तिक पौर्णिमा तिथीचा शुभ मुहूर्त 2025 (Kartik Purnima Tithi Shubh Muhurta) गंगा स्नान मुहूर्त (ब्रह्म मुहूर्त) - सकाळी 4 वाजून 52 मिनिटांपासून ते सकाळी 5 वाजून 44 मिनिटांपर्यंत सेल. पूजेचा शुभ मुहूर्त - सकाळी 7 वाजून 58 मिनिटांपासून सुरु होईल ते सकाळी 9 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे. कार्तिक पौर्णिमा पूजा आणि विधी (Kartik Purnima Puja and Vidhi) कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान,दीपदान आणि पूजेचं विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून गंगास्नान किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावं. जर, हे करणं शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करावं.
स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत. तसेच, ‘ॐ सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करुन जल अर्पण करावं. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या फोटोची पूजा करावी. संध्याकाळी पिंपळ किंवा तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावावा. कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व 2025 (Importance Of Kartik Purnima) कार्तिक पौर्णिमेला शास्त्राच फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे.
या दिवशी स्नान दान करण्याचं फार महत्त्व आहे. देव दीपावली :पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी सर्व देव-देवता पृथ्वीतलावत येऊन दिवाळी साजरी करतात. यासाठीच गंगा नदीच्या किनारी दिवे लावण्याची परंपरा आहे. पाप नष्ट होतात :मान्यतेनुसार, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत विशेषत:गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. भगवान शंकराचा विजय :या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.
यालाच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा :कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकल्याने आणि पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच, धन-संपत्तीची कमतरता भासत नाही. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.
यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ).







