: आयुष कोमकर माझा नातू, त्याचा खून करून मला काय मिळणार? कौटुंबिक वादातून आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आलं आहे असा युक्तिवाद बंडू आंदेकरकडून (Bandu Andekar) करण्यात आला. आपल्या मुलाची गेल्या वर्षी हत्या झाली, त्या प्रकरणात आपण फिर्यादी आहोत. त्याचा बदला म्हणून आपले नाव घेण्यात आले असल्याचं बंडू आंदेकरकडून सांगण्यात आलं. आयुष कोमकरची ज्या दिवशी हत्या (Ayush Komkar Muder Case) झाली त्या दिवशी आपण केरळमध्ये होतो असा युक्तिवादही करण्यात आला.
पुण्यातील आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात बंडू कोमकर याच्यासह सर्व आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे 15 सप्टेंबर रोजी आरोपींनी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी बंडू आंदेकरच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. तर बंडू आंदेकर आणि त्याची टोळीच या प्रकरणात आरोपी असल्याचा प्रतिवाद सरकारी वकिलांनी केला.
नातवाला मारून काय मिळणार?
या प्रकरणात आोरपी बंडू आंदेकरच्या वतीने युक्तिवाद करताना म्हटलं की, आम्ही गेल्या 10 तासांपासून अटकेत आहोत. जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो चुकीचा आहे. कल्याणी माझी मुलगी आहे जिने फिर्याद दिली. जो मयत झाला तो नातू आहे. गेल्या वर्षी माझ्या मुलाचा खून झाला होता. त्यात मी फिर्यादी आहे. मी त्यावेळी सांगितलं होतं की कल्याणीने देखील कट रचला होता. या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांना अटक झाली आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी मला यामध्ये गोवण्यात आलं आहे.
मी माझ्या नातवाचा खून का करू? मला काय मिळणार?आयुष माझा वैरी आहे का? असे प्रश्न उपस्थित करत बंडू आंदेकरने त्याच्यावर दाखल झालेला गुन्हा चुकीचा असल्याचं सांगितलं. वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मी फिर्यादीच्या पतीचे, सासऱ्याचे आणि दीराचे नाव घेतले आहे. म्हणून माझं नाव यात गोवल गेलं असा आरोप बंडू आंदेकरने केला. माझं संपूर्ण कुटुंब जेल मध्ये गेलं पाहिजे हाच यामागचा उद्देश आहे. कारण माझ्या मुलाच्या खून प्रकरणी मी कल्याणीच्या घरच्यांना जेलमध्ये पाठवलं आहे असंही बंडू आंदेकरच्या वतीने सांगण्यात आलं.
मी त्यावेळी केरळमध्ये होतो
ज्या दिवशी आयुष कोमकरची हत्या झाली त्यावेळी आपण केरळमध्ये असल्याचा दावा बंडू आंदेकरने केला. आमचे घरघुती वाद आहेत, म्हणून नाव घेतलं गेलं असंही म्हटलं.
वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कृत्य
आंदेकर आणि कोमकर परिवारात वाद आहे हे मान्य आहे. आरोपीच्या मुलाचा गेल्या वर्षी खून झाला होता, त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच आयुष कोमकरला मारल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. या प्रकरणी सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे. या प्रकरणी अजून कोण सहभागी आहे याचा तपास करायचा आहे असं सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.
13 जणांनी कट रचला
तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितलं की, "आयुष कोमकरच्या हत्येचा कट हा 13 जणांनी रचला होता. त्यापैकी दोघांनी भवानी पेठमधील पार्किंगमध्ये जात पिस्तूलने फायरिंग करून खून केला. इतर आरोपींच्या सांगण्यावरून हा खून करण्यात आला. या प्रकरणात वापरण्यात आलेले पिस्तूल आम्हाला जप्त करायचं आहे. पिस्तूल आणि गोळ्या कुठून आणल्या याचा तपास करायचा आहे. इतर पाच आरोपी फरार आहेत, त्यांचा पत्ता याच आरोपींना माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करायचा आहे."
या प्रकरणातील आरोपींनी सोमनाथ गायकवाड याच्या घराची देखील रेकी केली होती. आंदेकर टोळीने याआधी आंबेगावमध्ये सोमनाथ गायकवाड यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणातील अनेक आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. एकेका आरोपीवर 22 किंवा 33 गुन्हे दाखल आहेत अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
ही बातमी वाचा: