भिवंडी: शेजारी राहणाऱ्या तरुणीने प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून एकतर्फी प्रेम करणाऱ्या २४ वर्षीय शेजाऱ्यानं तिची हत्या केली. २३ वर्षीय तरुणीची भाजी कापण्याच्या सुऱ्याने तिच्या राहत्या घरातच १० महिन्यापूर्वी गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यामधील खळबळजनक बाब म्हणजे मोठ्या बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या लहान बहिणीलाही सुऱ्याने वार करून गंभीर जखमी केले होते. ही घटना भिवंडी शहरातील भादवड गावातील कानिफनाथ मंदिराजवळील कृष्णानगरमधील शत्रुघ्न तरे चाळीत घडली होती. हत्या करून फरार आरोपीच्या हातावरील टॅटूमूळ १० महिन्यांनंतर इंदूरमधून अटक करण्यात शांतीनगर पोलिस पथकाल यश आले. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे. नितु भान सिंग (२३) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर राजू महेंद्र सिंग (२४) असे हत्या करणाऱ्या आरोपी तरुणाचे नाव आहे.
भाजी कापण्याच्या सुऱ्याने नितुच्या शरीरावर सपासप वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून मयत तरुणीही मूळची उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यातील ग्राम नेवादा (दुरस्ता) या एकाच गावातील रहिवाशी होते. कुटुंबासोबत मृतक व आरोपी हे दोघेही भिवंडी शहरातील भादवड गावातील कृष्णानगर मधील भरत तरे यांच्या चाळीतील शेजारी शेजारी भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यामुळं एकमेकांना ओळख असतानाच मृतक तरुणीने शेजाऱ्याला प्रेमसंबंधास नकार दिला होता.याच रागातून २८ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास आरोपी राजूने मयत नितु घरी एकटी असताना भाजी कापण्याच्या सुऱ्याने नितुच्या शरीरावर सपासप वार करून तिची निर्घृण हत्या करून फरार झाला होता.
नितुची लहान बहिण रितूने नितुला वाचवण्यासाठी मध्यस्थी..
तर दुसरीकडे मयत नितुची लहान बहिण रितूने नितुला वाचवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने रीतुच्या बोटाजवळ सुऱ्याने वार करून तिलाही गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी मयत नितुच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भान्यासं कलम १०३, ३३३, ११८ (१) सह मपोकाक ३७ (१), १३५ अन्वये राजूच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलिसांची कुणकुण लागताच राजू घटना स्थळावरून फरार झाला होता. तेव्हापासून पोलिस त्याचा सीसीटिव्हीच्या आधारे कसून शोध घेत होती.
हातावरील टॅटूने त्याची ओळख पटवली आणि हत्येचे रहस्य उलगडले
पोलिस त्याचा सतत शोध घेत होते, परंतु तो त्याचा मोबाईल फोन बंद करून आणि वारंवार त्याचे ठिकाण बदलून पळून जात होता. कधी तो उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागात तर कधी मध्य प्रदेशात लपून पोलिसांची दिशाभूल करत होता. अखेर शांतीनगर पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी इंदूरच्या देवास नाका परिसरात लपला आहे. माहितीची खात्री पटताच, पोलिस पथकाने इंदूर गुन्हे शाखेशी संपर्क साधला आणि संयुक्त कारवाई केली. आरोपीने स्वतःला सूरज असे सांगून पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या हातावरील टॅटूने त्याची ओळख पटवली आणि हत्येचे रहस्य उलगडले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
आरोपीला ताबडतोब भिवंडी येथे आणण्यात आले आणि न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईत डीसीपी शशिकांत बोराटे, एसीपी सचिन सांगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलिस निरीक्षक अतुल आडुकर आणि विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुरेश चोपडे, पोलिस हवालदार रिजवान सय्यद, राजेश पाटील, नीलेश महाले यांच्यासह पोलिस पथक सहभागी होते.