: नेपाळमध्ये सोशल मिडिया (Nepal Social Media Ban) बंदी विरोधात GenZ नं केलेल्या आंदोलनामुळं देशातील सत्तेला हादरे बसले आहेत. नेपाळच्या पंतप्रधांनाना राजीनामा द्यावा लागला आहे. नेपाळ सरकारनं सोशल मीडियावर बंदी घातल्यानं GenZ नं कालपासून आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आंदोलकांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्र्यांचे बंगले आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांना पेटवलं आहे.सेना आणि पोलिसांच्या हातातून आंदोलकांनी शस्त्र हिसकावून घेतली आहेत. नेपाळमध्ये GenZ आंदोलन करत असले तरी हे आंदोलन दोन मिलेनियलनं भडकावलं आहे. काठमांडूचे महापौर बालेन शाह (Balendra Shah) आणि सुदन गुरुंग (Sudan Gurung) या दोन्ही मिलेयनियलनी आंदोलन भडकेल अशा पद्धतीनं पोस्ट केल्या.
नेपाळमधील केपी शर्मा ओली यांच्या सरकारनं 4 सप्टेंबर 2025 ला सोशल मिडिया साईटवर बंदी घातली होती. ज्यामध्ये यूट्यूब, फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम आणि व्हाटसअपचा समावेश होता. ज्यामुळं नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला होता. केपी शर्मा यांच्या सरकारनं सोशल मीडियावर बंदी घालताच 36 वर्षांचा तरुण सुदन गुरुंग यानं GenZ ला आंदोलन करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्या. ओली सरकारमधील भ्रष्टाचार, घराणेशाही, काही व्यक्तींची वाढती संपत्ती याविरोधात सुदन गुरुंग आवाज उठवत होता. मात्र, त्याला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. 27 ऑगस्टला सुदन गुरुंग यानं एक पोस्ट लिहिली होती, त्यात 'जर आपण स्वत:ला बदललं तर देश स्वत: बदलेलं असं लिहिलं.
बालेन शाह यांची पोस्ट Balendra Shah Social Media Post
7 सप्टेंबरला VPN चा वापर करत बालेन शाह यांनी एक पोस्ट लिहिली. ती पोस्ट अशी होती, उद्याची रॅली GenZ ची आहे, या रॅलीत कोणतीही पार्टी, नेता, कार्यकर्ता किंवा खासदारानं स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी सहभागी होऊ नये. मी वयाच्या कारणामुळं त्या रॅलीत जाऊ शकत नाही, मात्र माझा पूर्ण पाठिंबा आहे.
काठमांडूचे महापौर बालेन शाह यांचं वय 35 असल्यानं ते स्वत: आंदोलनात सहभागी झाले नाहीत मात्र त्यांच्या पोस्टनं आंदोलनाची दिशा ठरवली. त्यांच्या पोस्टला 20 हजार शेअर मिळाले, 40 हजारांपेक्षा अधिक कमेंट केल्या गेल्या, ज्यामुळं लाखो तरुण आंदोलनासाठी काठमांडूच्या रस्त्यावर उतरण्यास तयार झाले.
सुदन गुरुंगची पोस्ट Sudan Gurung Social Media Post
यानंतर सुदन गुरुंग यानं एक पोस्ट केली, ज्यानं आंदोलनाचा भडका आणखी वाढला. त्याची पोस्ट अशी होती. 'आज जो दिवस आहे जेव्हा नेपाळचे तरुण उठतील आणि म्हणतील खूप झालं, हा काळ आमचा आहे, आमची लढाई आहे, ही आमच्यापासून, तरुणांपासून सुरु होते.
बालेन शाह आणि सुदन गुरुंग या दोघांच्या पोस्टमुळं GenZ चं आंदोलन पेटलं आणि 8 सप्टेंबरला लाखो आंदोलक रस्त्यावर उतरले. ज्यांनी राष्ट्रपती भवनावर, पंतप्रधान निवासस्थानावर दगडफेक केली. ज्यामुळं सैन्य आणि पोलिसांना फायरिंग करावी लागली. या आंदोलनात 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. 9 सप्टेंबरला आंदोलन पुन्हा भडकलं ज्यामुळं पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला आहे. राजीनामा दिल्यानंतर नेपाळच्या सैन्याच्या सुरक्षेत केपी शर्मा ओली सुरक्षित ठिकाणी रवाना झाले आहेत. आता नेपाळच्या पंतप्रधानपदासाठी बालेन शाह यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. आंदोलक त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.