Pitru Paksha 2025 : सध्या सगळीकडे पितृपक्ष पंधरवडा सुरु आहे. हिंदू धर्मात पितृपक्षाला फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. त्यानुसार, यंदा 7 ते 21 सप्टेंबर 2025 पर्यंत हा पितृपक्ष पंधरवडा सुरु असणार आहे. या कालावधीत पूर्वज आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात अशी धार्मिक मान्यता आहे. त्यानुसार, वंशज आपल्या पूर्वजांची पूजा करतात. तसेच, पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी श्राद्ध घालतात, तर्पण विधी करतात. आणि हे अन्न कावळ्याला खाऊ घालतात. पण, पितृपक्षात कावळ्याच अन्न का दिलं जातं? कावळ्याचा आणि पितरांचा नेमका संबंध काय? असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
पितृपक्ष म्हणजे काय? (What Is Pitru Paksha?)
भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष तिथीला येणारा विधी म्हणजेच पितृपक्ष. पितृपक्षाचा कालावधी पंधरा दिवसांचा असतो. म्हणून त्याला पितृपक्ष पंधरवडा असं म्हणतात. त्यानुसार, यंदा 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2025 हा पितृपक्षाचा कालावधी आहे. या कालावधीत पूर्वज आपल्या घरी येतात आणि आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करुन कावळ्यांना भोजन देतात.
पितृपक्षात कावळ्यांना भोजन का देतात? (Why do we feed crows during Pitru Paksha?)
असं म्हटलं जातं की, कावळ्यांना भोजन दिल्याने श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. याच कारणामुळे पितृपक्ष पंधरवड्यात कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा आहे.
काय आहे पौराणिक कथा? (What is Mythology behind Pitru Paksha?)
पौराणिक कथेनुसार, इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रुप धारण करणारा पहिलाच होता. जेव्हा भगवान श्री राम पृथ्वीवर अवतरले त्यावेळी जयंतने कावळ्याचे रुप धारण करुन देवी सीतेच्या पायाला चोच मारली. तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंतच्या डोळ्यांवर बाण मारला. जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिलं की, पितृपक्षात तुला दिलेलं अन्न पितृ लोकांत राहणाऱ्या पूर्वज देवांना मिळेल असे आशीर्वाद दिले. तेव्हापासून पितृपक्षात कावळ्याना भोजन देण्याची परंपरा शतकानुशतकं सुरु आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते.
त्यामुळे तुम्ही ठेवलेला नैवेद्य कावळ्याने स्वीकार केला आणि ग्रहण केला तर देव यमराजही प्रसन्न होतात अशीही मान्यता आहे.