Pune Crime Andekar Gang Mcoca : आंदेकर टोळीला झटका; बंडू आंदेकरच्या नांग्या ठेचण्यासाठी पुणे पोलिसांची सर्वांत मोठी कारवाई; घराचीही झाडाझडती

Pune Crime Andekar Gang Mcoca : आंदेकर टोळीला झटका; बंडू आंदेकरच्या नांग्या ठेचण्यासाठी पुणे पोलिसांची सर्वांत मोठी कारवाई; घराचीही झाडाझडती
By : | Edited By: Ankita Khane | Updated at : 11 Sep 2025 07:56 AM (IST)

पुणे : पुण्यातील नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्ध आणि कौटुंबिक वादातून उगम पावलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर आणि त्याच्या १३ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. आयुष कोमकर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बंडू आंदेकर टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी विरोधी कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया पोलीसांकडून सुरु केली आहे.

आयुष कोमकर हा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे तो बंडू आंदेकरचा नातू असल्याची माहिती समोर आली आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुषचा खून घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक झाली असून, इतर फरार आरोपींचा पोलिसांकडून जोरदार शोध सुरू आहे.

आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा राणोजी आंदेकर (वय ६४), आंदेकर याचा नातू तुषार वाडेकर (वय २४), स्वराज वाडेकर ( वय २१), विवाहित मुलगी वृंदावनी वाडेकर (वय ४०), तसेच अमन युसूफ पठाण उर्फ खान (वय २२, सर्व रा. नाना पेठ), सुजल मेरगू (वय २३) यांना परिसरातून अटक करण्यात आली. कोमकर खून प्रकरणात आरोपी अमित पाटोळे (वय १९), यश पाटील (वय १९) यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. कृष्णराज उर्फ कृष्णा आंदेकर (वय ४०), शिवम आंदेकर (वय ३१), लक्ष्मी आंदेकर (वय ६०), अभिषेक आंदेकर (वय २१) शिवराज आंदेकर (वय २०, सर्व रा. नाना पेठ) हे पसार झाले आहेत.

आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकरसह १३ जणांविरुद्ध कठोर कारवाईचा प्रस्ताव समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी तयार केला. हा प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे आणि परिमंडळ-एकचे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आवश्यक पडताळणीनंतर अखेर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आंदेकर टोळीविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.

आंदेकरच्या घराची झाडाझडती

बंडू आंदेकर याचे नाना पेठेतील डोके तालमीजवळ घर आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. आंदेकर याला नाना पेठेत आणण्यात आले. आयुष कोमकर खून प्रकरणात काही पुरावे सापडतात का? या दृष्टीने झडती घेण्याचे काम सुरू होते.

📚 Related News