Satish Shah Death: बॉलीवूडचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते सतीश शाह (Satish Shah) यांच्या निधनाने बॉलीवूडसह संपूर्ण मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली. किडनी निकामी झाल्यामुळे त्याचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाल्याचं सांगितलं जात होत मात्र आता त्यांच्या निधनामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. मात्र, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेत त्यांच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या राजेश कुमार यांनी त्यांच्या निधनामागचं खरं कारण स्पष्ट केलं आहे. राजेश कुमार (Rajesh Kumar) यांच्या म्हणण्यानुसार सतीश शाह यांचा मृत्यू किडनीमुळे नव्हे, तर अचानक झालेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे (हार्ट अटॅक) झाला. 74 वर्षांचे सतीश शाह यांनी 25 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला.
सुरुवातीला त्यांचा मृत्यू किडनी फेल्युअरमुळे झाल्याचं म्हटलं जात होतं, कारण काही महिन्यांपूर्वीच त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं. 'सतीश शाह यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे' राजेश कुमार यांनी ‘बॉलीवूड हंगामा’ शी बोलताना सांगितलं, “गेल्या 24-25 तासांत आम्ही जे अनुभवत आहोत ते शब्दांत सांगता येणं कठीण आहे. पण मला सतीशजींच्या निधनाबद्दल काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. हो, त्यांना किडनीची समस्या होती, पण ती पूर्णपणे नियंत्रणात होती. त्यांचा मृत्यू प्रत्यक्षात हार्ट अटॅकमुळे झाला.
” राजेश कुमार यांनी पुढे सांगितलं की, सतीश शाह हे निधनाच्या दिवशी घरी जेवण करत असताना अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. “काही माध्यमांतून चुकीची माहिती पसरली होती की त्यांचा मृत्यू किडनीच्या आजारामुळे झाला. पण तसं नाही. त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी झालं होतं आणि ते उपचाराखाली होते. दुर्दैवाने अचानक आलेल्या हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाला,” असं ते म्हणाले.
सतीश शाह यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात आता फक्त पत्नी मधु शाह आहेत. त्यांना अपत्य नव्हतं. मधु शाह या सध्या अल्झायमर या आजाराने त्रस्त आहेत. अभिनेता सचिन पिलगांवकर यांनी सांगितलं होतं की, सतीश शाह हे आपल्या पत्नीकरता जगत होते आणि त्यांच्या काळजीसाठीच त्यांनी किडनी ट्रान्सप्लांट करवून घेतलं होतं. सचिन आणि सतीश यांनी एकत्र मराठी सिनेमातही काम केलं होतं आणि तेव्हापासून त्यांचं घट्ट मैत्र कायम राहिलं होतं.








