Beed crime news: च्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 34) यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली होती. गोविंद बर्गे यांचे कला केंद्रात नर्तकी असणाऱ्या पूजा गायकवाड (वय 21) हिच्याशी प्रेमसंबंध होते. गेल्या दीड वर्षांपासून या दोघांचे प्रेमकरण सुरु होते. मात्र, अलीकडच्या काळात या दोघांमध्ये बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्याकडे गेवराईतील त्यांचा नवीन बंगला आपल्या नावावर करण्याची मागणी केली होती. तसे न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिने दिली होती. त्यामुळे गोविंद बर्गे नैराश्यात होते. सोमवारी रात्री ते बार्शी तालुक्यातील सासूर येथील पूजाच्या घरी गेले होते. यानंतर मंगळवारी सकाळी तिच्या घरासमोरच गाडीत गोविंद (Govind Barge Suicide) यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून घातपाताचा प्रकार आहे, असा दावा केला आहे. गोविंद बर्गे यांच्या भाच्याने या प्रकरणात राजकीय कनेक्शन असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
गोविंद बर्गे यांच्या भाच्याने एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले की, माझा मामा हा निर्व्यसनी होता. त्याच्याकडे कधीही बंदूक नव्हती. हा काहीतरी मोठा कट असून माझ्या मामाला फसवण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून माझा मामा प्रचंड तणावात होता. काही राजकीय लोकांनीच माझ्या मामाची आणि पूजा गायकवाडची ओळख करुन दिली होती. त्यांनी कट रचून हे सर्व केले. पण आता वेगळेच चित्र दाखवले जात आहे, असा दावा गोविंद बर्गे यांच्या भाच्याने केला. आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्या मामाला कोणतेही व्यसन नसताना त्याच्या गाडीत दारुच्या बाटल्या टाकण्यात आल्या, असेही बर्गे यांच्या भाच्याने म्हटले. गोविंद बर्गे हे त्यांच्यासोबत कधी साधी काठीही ठेवत नव्हते. मग त्यांच्याकडे पिस्तूल असण्याचा प्रश्नच येत नाही, असा ठाम दावा गोविंद बर्गे यांच्या इतर नातेवाईकांनी केला. त्यामुळे याप्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. गोविंद बर्गे यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरुन डाव्या भागातून बाहेर पडली होती. त्यामुळे आता पोलिसांना गोविंद बर्गे यांच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यामधून कोणती नवीन गोष्ट समोर येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, पोलिसांनी नर्तकी पूजा गायकवाड हिला अटक केली आहे. तिला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पूजा गायकवाड हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता तिच्या चौकशीतून काय माहिती बाहेर येणार, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा