बीड: बीडच्या रामगड परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीला गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. दोन दिवसांपूर्वीच या चिमुकलीच्या वडिलांनी इमामपूर रोड परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. हा सर्व प्रकार कौटुंबिक कारणावरून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातो आहे. दोन दिवसांपूर्वी वडील आणि आज सकाळी मुली मृतदेह लिंबाच्या झाडाला आढळून आला. या घटनेनं बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
जयराम शहादेव बोरवडे आणि अक्षरा जयराम बोरवडे असं मृत झालेल्या पित्याचे आणि चिमूरड्या मुलीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी जयराम आपल्या मुलीला घेऊन घरातून निघून गेला होता. त्यानंतर काही तासातच त्याचा मृतदेह इमामपूर शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र तीन वर्षांची चिमूरडी आढळली नाही. पोलिसांनी परिसरात शोधाशोध केला. मात्र आज सकाळी शहरानजीक रामगड परिसरात तीन वर्षीय अक्षरा बोरवडे या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. प्रथम दर्शनी ही घटना कौटुंबिक वादाच्या कारणावरून झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. चार वर्षांपूर्वी जयराम याचा विवाह झाला होता आणि त्याला तीन वर्षांची ही मुलगी झाली या मुलीवर त्याचा फार जीव होता असं नातेवाईकांकडून सांगण्यात आलं. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत.
त्याच्याजवळ पैसे नव्हते त्याने ३० रूपये उधार घेतले अन्...
तो सकाळी साडेसात वाजता बरोबर घराबाहेर पडला होता, मुलीला सोबत घेतलं त्यानंतर तो इकडेच फिरत राहिला. त्यानंतर चार वाजता आम्हाला अशी घटना समजली त्याने गळफास घेतला आहे अशी, गावातून मला एकाचा फोन आला होता. त्याने भावाने फाशी घेतली आहे का? विचारणा केली होती. तेव्हा त्याने सांगितलं जयरामने फाशी घेतली आहे. तोपर्यंत आम्हाला कोणती माहिती नव्हती. चिमुकल्या मुलीचा मृतदेह रामगड परिसरात आज आढळला, गाडी लांब कुठेतरी आढळली. त्याच्याजवळ जाण्यासाठी पैसे देखील नव्हते, तो कसा गेला माहिती नाही. फक्त दोन तासात हे सगळं घडलं. बारा वाजता तो उंबरीला होता, पुन्हा तिकडे गेला, तिला फाशी दिली. गाडीतलं पेट्रोल संपलं. तिथून तिकडे गेला. त्याला तिकडे जायला काय भेटलं काय माहिती. त्याच्या खिशात पैसे देखील नव्हते. चहा प्यायला एका हॉटेलवर थांबला होता, त्याने कोणाकडून तरी तीस रुपये मागून घेतले होते, इतक्या लांबून तो तिकडे कसा गेला, कशात बसून गेला त्याचा त्यालाच माहिती. पोलिसांनी याबाबत सर्व तपास केला पाहिजे. या मागचं कारण पोलिसांनी समोर आणलं पाहिजे. त्याची कोणासोबतच भांडण झालेली नव्हती. आमची कोणासोबत तेवढी टोकाची भांडण नव्हती. आम्ही काल त्या हॉटेलवाल्याला भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं त्याच्याकडे पैसे नव्हते, त्याच्यासोबत मुलगी होती. त्यांनी कोणाकडून तरी चहा पिण्यासाठी पैसे मागून घेतले. त्याच्या या टोकाच्या निर्णयामागचं आम्हालाही कारण माहिती नाही. त्याच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली होती. 2021 मध्ये त्याच लग्न झालं होतं, त्याला एकच मुलगी होती, अशी माहिती मृत जयरामचा भाऊ संतोष बोरवडे यांनी दिली आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती
दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान इमामपूर शहरांमध्ये जयराम बोरवडे याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता, त्याबाबत मृतदेहाच्या पोस्टमार्टम करून पुढील कार्यवाही करण्यात आलेली आहे, त्यादरम्यान त्यांच्यासोबत त्यांची तीन वर्षाची मुलगी अक्षरा ती सापडली नव्हती, तिचा शोध सुरू होता, आज त्या तीन वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह रामगड परिसरामध्ये आढळून आला आहे. पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे, याबाबतचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील कारण अद्याप समोर आलेले नाही, तपास सुरू आहे. यामागे कौटुंबिक कारण आहे की अन्य कोणते कारण आहे, याचा शोध सुरू आहे. त्यांनी स्वतः घेऊन मुलीला गळफास दिला का याचा शोध सुरू आहे. या घटनेच्या तपासासाठी तीन वेगवेगळे पथके तैनात करण्यात आली आहेत. याबाबत तपास सुरू असून पुरावे हस्तगत करण्याचा काम सुरू आहे. आत्तापर्यंतच्या तपासानुसार मुलीच्या वडिलांनीच तिला गळफास दिला असावा अशी शक्यता असून त्यानंतर त्यांनी देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिली आहे.