Solapur Crime: सोलापुरातील तरुणाई कला केंद्राच्या विळख्यात अडकली, टेंभुर्णी गोळीबारानंतर सोलापूर पोलिसांसमोर मोठं आव्हान

Solapur Crime: सोलापुरातील तरुणाई कला केंद्राच्या विळख्यात अडकली, टेंभुर्णी गोळीबारानंतर सोलापूर पोलिसांसमोर मोठं आव्हान
By : | Edited By: Rohit Dhamnaskar | Updated at : 11 Sep 2025 12:07 PM (IST)

Solapur Kala Kendra Crime: कला केंद्राच्या नादात तरुणाई आपले जीवन उद्ध्वस्त करताना दिसू लागली आहे. नर्तकीसाठी सासुरे येथे आत्महत्या आणि आता टेंभुर्णी (Tembhurni) येथील कला केंद्रावर गाणे लावण्यावरून तरुणांकडून झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांसमोरील आव्हाने वाढणार आहेत. कला केंद्रातील एका नर्तिकेच्या (Kala Kendra Dancer) वेडापायी गेवराई येथील एका तरुण सरपंचाने केलेल्या आत्महत्येचे प्रकरण गाजत असताना आता टेंभुर्णी जवळील वेणेगाव येथे केवळ बैठकीत गाणे लावण्यावरून वाद झाला आणि चक्क एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर गोळीबार केला. या प्रकारानंतर करमाळ्याच्या डीवायएसपी अंजना कृष्णा यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार या गोळीबार प्रकरणातील चारपैकी तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली असली तरी अद्याप यातील एक तरुण आणि गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल मिळवण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

या गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल हा गावठी कट्टा असण्याचा संशय असून या कला केंद्रावर झालेल्या वादातील दोन्ही तरुणांचे गट हे पंढरपूर तालुक्यातील आहेत. वेणेगाव येथील जय मल्हार लोकनाट्य कला केंद्रावर देवा कोठावळे व त्याचे तीन मित्र गेले होते. याच ठिकाणी नंतर आलेल्या सुरज पवार व त्याच्या तीन मित्रांमध्ये गाणे लावण्यावरून वाद झाला. यानंतर कला केंद्र चालकाने या दोन्ही तरुणांच्या गटाला बाहेर काढले. मात्र, या दोन गटातील वादावादी वाढली आणि एकाने देवा कोठावळे याच्या मांडीवर गोळी झाडली. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने आरोपी सुरज पवार आणि त्याच्या दोन साथीदारासह ज्या गाडीतून हे तरुण आले होते ती गाडी जप्त केली आहे. या ठिकाणी गोळीबारात गोळीची पुंगळी ही पोलिसांनी जप्त केली असली तरी यातील एक आरोपी आणि वापरण्यात आलेले पिस्तुल मात्र अद्याप पोलिसांना मिळालेले नाही.

जिल्ह्यात मोडलिंब, करकम, शेटफळ, टेंभुर्णी, बार्शी अशा अनेक ठिकाणी कला केंद्रे असून या ठिकाणी मराठवाडा आणि पश्चिम ातून अनेक शौकीन तरुण येत असतात. सहज मिळालेला पैसा गुंडगिरीबाबतचे आकर्षण यातून या कला केंद्रावरील तरुणाईचा राबता वाढू लागला असून यामुळे येथे वाढू लागलेली गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

आणखी वाचा

📚 Related News