Beed Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेटमधील बीड जिल्हा नेमका कसा होता, नाव काय होतं, मोहम्मद बिन तुघलकाशी काय कनेक्शन?

Beed Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेटमधील बीड जिल्हा नेमका कसा होता, नाव काय होतं, मोहम्मद बिन तुघलकाशी काय कनेक्शन?
By : | Edited By: Rohit Dhamnaskar | Updated at : 11 Sep 2025 12:51 PM (IST)

Beed Hyderabad Gazette: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनावेळी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. तेव्हापासून हैदराबाद गॅझेटची (Hyderabad Gazette) प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. 1909 सालच्या हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचं म्हणजे त्यावेळच्या औरंगाबाद विभागातील बारीकसारीक तपशीलाची नोंद आहे. 1948 पर्यंत मराठवाडा निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता. म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जवळपास वर्षभर मराठवाडा निजामाच्या तावडीत होता. अखेर अनेकांच्या संघर्षांतून १७ सप्टेंबर १९४८ ला मराठवाडा मुक्त झाला, स्वतंत्र भारताचा भाग बनला. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी हैदराबाद गॅझेटचं खूप महत्वं आहे. 1909 सालच्या हैदराबाद गॅझेटमध्ये विभागातील बारीकसारीक तपशीलाची नोंद आहे. मनोज जरांगेंचा मूळ जिल्हा आणि त्यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्र ठरलेल्या बीड (Beed District) जिल्ह्याची हैदराबाद गॅझेटमध्ये तपशीलवार नोंद करण्यात आली आहे.

Beed District: हैदराबाद गॅझेटमध्ये कसं आहे बीड?

बीड जिल्ह्याचा केज, अंबा, भिर, पाटोदा म्हणजे जवळपास अर्धा भाग बालाघाट तर गोदाकाठचे माजलगाव, गेवराई आणि बीड तालुक्यातील काही सखल भाग गंगथडी म्हणून प्रसिद्ध आहेत. 60-70 वर्षे आधी र्यंत जिल्ह्यात चांगलं जंगल होतं. या परिसरात कधी तरी वाघ दिसायचा
पण काळवीट, अस्वल, बिबट्या, रानडुक्कर, तरसं, लांडग्यांचा वावर नित्याचा होता. बीडचे जुने पांडवकालीन नाव दुर्गावती होते, त्यानंतर हे नाव बालनी झाले. राजा विक्रमादित्याच्या बहिणीने म्हणजे राणी चंपावतीने हे शहर जिंकले तेव्हा बीडचे नाव चंपावतीनगर ठेवले.

त्यानंतर हा परिसर आंध्रचे चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव यांच्या साम्राज्याचा भाग राहिला. चंपावतीनगरचं नाव कोणी बदललं कधी बदललं याचा उल्लेखही गॅझेटमध्ये करण्यात आला आहे. 1326 साली कुप्रसिद्ध मोहम्मद बिन तुघलकाने आपली राजधानी दिल्लीवरुन देवगिरीवर आणली. त्याकाळात तुघलकाने चंपावतीनगरचे नाव भिर /BHIR ठेवले. तुघलकाचा दात पडला त्या दातांच थडगं तुघलकाने शहराजवळच्या कर्जनीमध्ये बांधलं अशी दंतकथा आहे. तुघलकानंतर बीडवर बहामनी, निजामशाही आणि आदिलशाहीची सत्ता होती

1635 मध्ये बीड मुघलांनी ताब्यात घेतले आणि बीडवर दिल्ली सल्तनतची सत्ता आली, पण काही काळातच निजामाने बीड परत घेतले.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला बीड निजामशाही हैदराबाद संस्थानचा मुख्य भाग बनले. गॅझेटमध्ये अंबा तालुक्याचा उल्लेख आहे, तिथे जोगाई नावाच्या देवीचं मंदिर आहे.हे प्रसिद्ध ठिकाण आहे असं लिहिलंय, आता याला आपण अंबाजोगाई नावाने ओळखतो ते हेच ठिकाण. बीड जिल्हा छागल म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या चामडी पिशव्या आणि गुप्ती सारखं शस्त्र बनवण्यासाठी प्रसिद्ध असल्याची नोंद आहे. आणि आता याच नोंदींमुळे मनोज जरांगेंप्रमाणेच धनगर आणि कोळी समाज सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेताना दिसत आहेत.


Beed Caste: बीडमधील जातीचं गणित

* १८८१ च्या जनगणनेनुसार बीडची लोकसंख्या ५ लाख ५८ हजार होती

* १८९१ च्या जनगणनेनुसार ६ लाख ४२ हजार

* १८९९-१९०० साली मोठा दुष्काळ पडला होता, उपासमारीचा सामना करावा लागला

* त्यामुळे १९०१ साली लोकसंख्या ४ लाख ९२ हजार झाली

* म्हणजे त्या दुष्काळामुळे, उपासमारीमुळे जिल्ह्यात दीड लाख लोक मृत्यूमुखी पडले

* वार्षिक सरासरी पाऊसमान ३० इंच म्हणजे साधारण ७५० मिलीमीटर आहे.

* मात्र १८९९-१९०० साली सरासरीच्या ५० टक्केच पाऊस पडल्याची नोंद

* जिल्ह्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोक हिंदू आहेत, त्यातले ८७ टक्के मराठी बोलतात

* 'मराठा-कुणबी' जातीची लोकसंख्या सर्वाधिक १ लाख ९६ हजार आहे,जी एकूण लोकसंख्येच्या ३९ टक्के आहे

* त्या खालोखाल शेती कसणाऱ्या जातीत बंजारा (३६ हजार)आणि कोळी (२६००) समाजाची लोकसंख्या असल्याचा उल्लेख

* महार ४२ हजार ३००

* धनगर २६ हजार

* मांग+चांभार २५ हजार ४००

* ब्राह्मण २१ हजार ६००

* माळी १२ हजार ७००

* वाणी ७ हजार

* मारवाडी ६ हजार

* ख्रिश्चन ९१

अशा आकडेवारीची हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद आहे.

📚 Related News