पेनकिलर गोळ्या, अन्नातून जास्त मीठ या रोजच्या सवयी तुमची किडनी बिघडवत आहे का?

पेनकिलर गोळ्या, अन्नातून जास्त मीठ या रोजच्या सवयी तुमची किडनी बिघडवत आहे का?
By : | Updated at : 08 Sep 2025 09:34 PM (IST)

: शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकणे, द्रवपदार्थांचे संतुलन राखणे आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अशी कामं आपली किडनी नियमितपणे करत असते. मात्र आपल्या रोजच्या काही सवयी हळूहळू या अवयवांवर परिणाम करत असतात. यामध्ये दोन मुख्य गोष्टी म्हणजे वेदनाशामक गोळ्या म्हणजे पेनकिलर गोळ्यांचा वारंवार वापर आणि मीठाचे अतिप्रमाणात सेवन होय. यामुळे आपल्या किडनीचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

डोकेदुखी, ताप, अंगदुखी यासारख्या गोष्टींवर आपण अनेकदा सहजपणे अनेक वेदनाशामक गोळ्या घेतो. कधीमधी घेतल्यास या सुरक्षित असल्या तरी, वारंवार किंवा दीर्घकाळ वापरल्यास या किडनीकडे जाणारा रक्तप्रवाह कमी करतात. त्यामुळे टॉक्सिन्स फिल्टर करण्याची क्षमता घटते. असे झाल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्यांना किंवा वयोवृद्धांना याचा धोका अधिक असतो. आरामासाठी घेतलेली छोटी गोळी हळूहळू एक अदृश्य धोका ठरू शकते असं मत युरोलॉजिस्ट डॉ. मंगेश पाटील यांनी व्यक्त केलं.

मीठ हा आणखी एक शांत शत्रू आहे. फक्त चवीनुसार टाकलेले मीठ नव्हे, तर लोणचं, पापड, पॅकबंद स्नॅक्स, इंस्टंट फूड्स आणि रेडीमेड जेवणांमधूनही आपल्याला प्रचंड मीठ मिळते. जास्त मीठ घेतल्याने रक्तदाब वाढतो जे किडनी विकाराचे मुख्य कारण आहे आणि यामुळे किडनीवर अधिक ताण येतो. इतकंच नाही, तर किडनीतून प्रथिने लीक होण्यास सुरुवात होते, हे किडनी निकामी होण्याचे पहिले लक्षण असू शकते.

किडनी रोगाचे सर्वात चिंताजनक वैशिष्ट्य म्हणजे तो सुरुवातीला कुठलाही त्रास देत नाही. बराच वेळ लोकांना काहीही त्रास जाणवत नाही, आणि जेव्हा सूज, थकवा, लघवी कमी होणे असे लक्षणं दिसू लागतात, तेव्हा कधी कधी डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय उरतो.

किडनीचे संरक्षण कसे करावे?

• वेदनाशामक औषधं केवळ अत्यावश्यकतेनुसारच आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

• दीर्घकालीन वेदनेसाठी एक्सरसाईज, फिजिओथेरपी किंवा रिलॅक्सेशन टेक्निक्सचा विचार करावा.

• मीठाचे प्रमाण दिवसाला एक चमच्यापेक्षा कमी ठेवा. शक्यतो ताजे जेवण बनवा आणि पॅकबंद पदार्थांपासून दूर रहा.

• धोका अधिक असलेल्यांनी म्हणजेच उच्च रक्तदाब, मधुमेह व वयोवृद्ध असलेल्यांनी नियमितपणे रक्तदाब आणि किडनी फंक्शन तपासून घ्यावे.

थोड्याशा जीवनशैलीतील बदलांनीही आज आपण आपली किडनी सुरक्षित ठेवू शकतो.

ही बातमी वाचा:

Check out below Health Tools-

📚 Related News