मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये; उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडेंची ठाम भूमिका

मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये; उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडेंची ठाम भूमिका
By : | Edited By: Mahesh M Galande | Updated at : 10 Sep 2025 02:33 PM (IST)

: सरकारने हैदराबाद गॅझेटियरचा शासन निर्णय जारी करत मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानंतर आता ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचीही नियुक्ती करण्यात आली. या उपसमितीच्या अध्यक्षांसह सदस्यांची आज बैठक झाली. या बैठकीत ओबीसी नेते आणि मंत्री आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, पंकजा मुंडे यांनी बैठकीनंतर बाहेर येताच मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये यासाठी आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे, असेही पंकजा यांनी म्हटले.

ओबीसी उपसमिती बैठकीत छगन भुजबळ आक्रमक झाले होते, सरकारने काढलेल्या जीआरमधील मराठा शब्दावर आक्षेप घेत त्यांनी बैठकीत आपली भूमिका मांडली. मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसीला फटका बसतोय, असे भुजबळ यांनी ओबीसी उपसमितीच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं. तर, ओबीसी उपसमितीला सदस्य मंत्री उपस्थित होते, बैठकीत आमची विस्तृत चर्चा झाली. त्यामध्ये, ओबीसी हिताच्या बाबतीत निर्णय झाले आहेत. जागृतपणे निर्णय होत आलेले आहेत, ओबीसींमध्ये अनेक जाती आहेत, मिळणारे लाभ योजना, निधी यावर चर्चा झाली. तसेच, मराठा आरक्षणामुळे ओबीसींवर अन्याय होणार नाही, याचीही चर्चा झाल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

पुढच्या बैठकीत कोणते निर्णय घेतले पाहिजे, निधी संदर्भात अन्याय झाला नाही पाहिजे यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. राज्यात गेली अनेक दशकं मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे, आणखी लोकं ओबीसीत घेण्याचं स्वागत होत नाही. मात्र, कुणबी नोंदणीसंदर्भात आमचं कोणतंही म्हणणं नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. मात्र, अवैद्य नोंदी दिल्या जाऊ नये, यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी. तर, मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये यासाठी आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे, असेही पंकजा यांनी सांगितले. हैदराबाद गॅजेटियरचा विषय आल्यावर बंजारा समाज देखील आरक्षण मागतोय, अशात संवैधानिक चौकटीत सर्व निर्णय घेतले जावे. मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली आहे, ओबीसींवर अन्याय होणार नाही असं ते म्हणाले, अशी माहितीही पंकजा यांनी दिली.

भुजबळांचे अनुभवाचे बोल

छगन भुजबळ नाराज आहेत असं म्हणता येणार नाही, त्यांचे अनुभवाचे बोल आहेत त्याला नाराजी म्हणता येणार नाही. पारंपरिक कुणबी प्रमाणपत्राबद्दल आमचा विरोध नाहीच, पण अवैद्य दाखले दिले गेले तर आमच्या अधिकारावर गदा येईल, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळांच्या नाराजीवर भाष्य केलं.

हेही वाचा

📚 Related News