ठाणे : जिल्ह्यातील मुरबाड नगरपंचायतीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. नगरपंचायतीतील 17 सदस्यांपैकी परिवर्तन पॅनलमधील तब्बल 8 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करून भाजपला जोरदार धक्का दिला आहे. या पक्षप्रवेशामुळे मुरबाडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपकडून विकासकामांसाठी निधी न देणे, जाणूनबुजून कामे डांबणे यामुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली असून, शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीने आणि जनसंपर्काने प्रेरित होऊन हा निर्णय घेतल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले. या पक्षप्रवेश प्रसंगी शिवसेना नेते प्रकाश पाटील , शिवसेना उपनेते रुपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख देवानंद थळे, मारुती धिरडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडले आहेत.
भिवंडीतील पडघा येथे शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष रामभाऊ भगवान दुधाळे, उपनगराध्यक्षा दीक्षिता विकास वारघडे, गटनेते मोहन भालचंद्र गडगे, बांधकाम सभापती उर्मिला सुजित ठाकरे, पाणीपुरवठा सभापती स्नेहा सागर आंबवणे, नगरसेविका नम्रता नंदकुमार जाधव, रविना विनायक राव, अनिता संतोष मारके, तसेच इतर कार्यकर्ते विकास वारघडे, सुजित ठाकरे आणि नंदकुमार जाधव यांच्यासह अनेकांनी शिवसेना शिंदे गटात समावेश केला आहे. या निर्णयामुळे मुरबाडमधील राजकीय समीकरणात मोठा बदल झाला असून, आगामी काळातील राजकारणावर त्याचा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनच जिल्ह्याचा खऱ्याअर्थाने विकास होताना आम्ही बघितला आहे. जातीपातीचे राजकारण, ठराविक सदस्यांना निधी वितरण, यामुळे आम्ही वंचित होतो. त्यामुळे आम्ही भाजपपासून वेगळे होत परिवर्तन पॅनल स्थापन केले होते. पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा विकास होत असल्याने आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनी दिली आहे.
पक्ष ताकदीनिशी पाठिमागे उभा राहिल - पाटील
मुरबाड नगरपंचायती मधील परिवर्तन पॅनलच्या सर्व नागसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेऊन परिवर्तन पॅनल शिवसेने मध्ये विलीन केला आहे. सर्व नगरसेवक सातत्याने नगरविकास विभागाकडील निधीसाठी आग्रही असायचे. सर्वांना निधी मिळत असताना मुरबाड शहर वंचित राहत होता. मुरबाडच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे सर्वांचे पक्षात स्वागत असून त्यांच्या पाठीशी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा राहील, असा विश्वास शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला.