RBI Recruitment 2025 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ग्रेड बी ऑफिसर पदाच्या 120 जागांसाठी अर्ज मागवले आहे. आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरता येतील. ग्रेड बी ऑफिसर जनरल कॅटेगरी 83 जागा, ऑफिस ग्रेड बी डीईपीएआर मध्ये 17 आणि डीएसआयएम 20 अशा एकूण 120 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
आरबीआयच्या या भरती संदर्भातील नोटिफिकेशननुसार परीक्षा 18 आणि 19 ऑक्टोबरला होणार आहे. जे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करतील तेव्हा त्यांना परीक्षेपूर्वी काही दिवस अगोदर प्रवेशपत्र मिळेल.
ऑफिस ग्रेड बी जनरल पदासाठी उमेदवारानं कोणत्याही विषयातून पदवी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेलं असाव. तर, एससी, एसटी, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांनी पदवी किमान 55 टक्यांसह उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. ऑफिसर ग्रेड बी डीईपीआरसाठी इकोनॉमिक्स किंवा फायनान्स विषयात पदव्युत्तर पदवी झालेली असावी किंवा पीजीडीएम आणि एमबीए केलेलं असावं. ऑफिसर ग्रेडबी डीएसआयएम पदासाठी संख्याशास्त्र किंवा गणित या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असावं.
रिझर्व्ह बँकेतील ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 21 ते 30 वर्षा दरम्यान असावं. जे उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छितात त्यांना ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. त्यासह परीक्षा शुल्क देखील भरावं लागेल. खुला, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावं लागेल. तर, एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 100 रुपये असेल. परीक्षा शुल्काशिवाय जीएसटी देखील द्यावा लागेल.
आरबीआयमधील ऑफिसर पदाच्या 120 जागांसाठी उमेदवारी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आरबीआयच्या opportunities.rbi.org.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. या लिंकवर नोंदणी केल्यानंतर आवश्यक ती माहिती आणि कागदपत्रं जमा केल्यानंतर ऑनलाईन फी भरावी लागेल. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट आऊट काढून घ्या.
निवड होणाऱ्या उमेदवारांना 78450 मूळ वेतन दरमहा या प्रमाणं 78540-400(9)-114900-EB-4050(2)-123000-4650(4)-141600 या ग्रेड पे नुसार वेतन मिळेल. इतर सर्व भत्यांसह साधारणपणे दीड लाख पगार मिळेल. बँकेनं निवासस्थान उपलब्ध करुन न दिल्यास दरमहा घरभाडे भत्ता दिला जाईल.
आरबीआय ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात राबवली जाईल. दोन वेळा ऑनलाईन पद्धतीनं लेखी परीक्षा होईल. त्यानंतर मुलाखत होईल. ग्रेड बी ऑफिसर पदासाठी खुल्या आणि ईडब्ल्यूएस पदासाठी 6 वेळा परीक्षा देता येईल. इतर प्रवर्गांना अटेम्टची मर्यादा नाही.