Pune: डोक्यावर हेल्मेट नाही, सिग्नल तोडला तरी काळजी नको, पुण्यात वाहतूक दंडात मोठी सूट, नेमकं काय होणार?

Pune: डोक्यावर हेल्मेट नाही, सिग्नल तोडला तरी काळजी नको, पुण्यात वाहतूक दंडात मोठी सूट, नेमकं काय होणार?
By : | Updated at : 10 Sep 2025 11:35 AM (IST)

Pune: पुणेकरांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे. हेल्मेट, सीटबेल्ट न वापरणे, सिग्नल तोडणे, वाहन चालविताना मोबाइल वापरणे, चुकीचे पार्किंग यांसारख्या अनेक छोट्या वाहतूक नियमभंगांवर लावण्यात आलेले प्रलंबित दंड आता जास्तीत जास्त सवलतीत भरता येणार आहेत. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने 10 ते 13 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत नागरिकांना ही संधी उपलब्ध होणार आहे.

कुठे आणि कधी भरता येणार दंड?

या लोकअदालतीत नागरिकांना प्रलंबित दंड सवलतीच्या दरात भरून थकबाकीमुक्त होण्याची संधी दिली जाणार आहे. ही सुविधा येरवडा पोस्ट ऑफिसशेजारील वाहतूक शाखेच्या कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. त्यामुळे आपल्या नावावर असलेले जुने दंड प्रकरणे मिटविण्यासाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

कोणते दंड सवलतीत भरता येतील?

या उपक्रमाअंतर्गत लहान स्वरूपातील खालील नियमभंगांवरची दंडाची थकबाकी भरता येणार आहे:

*विनाहेल्मेट दुचाकी चालविणे

*सीटबेल्ट न लावता चारचाकी चालविणे

*सिग्नल तोडणे

*वेगमर्यादा ओलांडणे

*चुकीचे पार्किंग

*वाहन चालविताना मोबाइलचा वापर

*विनापरवाना, विना पीयूसी वाहन चालविणे

*फिटनेस प्रमाणपत्र नसणे

*चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे

*नंबरप्लेट नसणे

यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित असल्याने अनेक वाहनचालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कोणते दंड माफ होणार नाहीत?

मात्र काही गंभीर वाहतूक नियमभंगांसाठी दंडात कोणतीही माफी दिली जाणार नाही. त्यामध्ये –

*मद्यपान करून वाहन चालविणे

*अपघात करून पळ काढणे

*निष्काळजीपणे वाहन चालवून प्राणांतिक अपघात घडविणे

*अल्पवयीन मुलाने वाहन चालविणे

*अनधिकृत शर्यत आयोजित करणे किंवा त्यात सहभागी होणे

*गुन्ह्यांसाठी वाहनांचा वापर

*न्यायालयात सुनावणी प्रलंबित असलेली प्रकरणे

*अन्य राज्यातील वाहतूक नियमभंगांची चलने

या नियमभंगांवरील दंड केवळ कायदेशीर प्रक्रियेनंतरच वसूल केले जाणार आहेत.

नागरिकांसाठी दिलासा

वाहतूक पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार, या लोकअदालतीत सहभागी होऊन नागरिकांनी आपल्या प्रलंबित दंडांची थकबाकी भरून काढावी. सवलतीचा लाभ घेतल्यास नागरिकांवरची आर्थिक जबाबदारी कमी होईल तसेच वाहतूक शिस्तीबाबत जनजागृतीही वाढेल. यामुळे गेल्या काही वर्षांपासून वाढत असलेल्या प्रलंबित दंडांच्या रकमा कमी करण्यात मदत होईल. तसेच नियम पाळून सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व नागरिकांच्या मनात रुजविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

हेही वाचा

📚 Related News