: टॅरिफ तसेच जागतिक बाजारामध्ये मागणी वाढल्याने मंगळवारी एकाच दिवसात सोन्याच्या किमती विक्रमी ५ हजार ८० रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे सोने १,१२,७५० रुपये प्रति १० ग्रॅम या नव्या उच्चांकावर पोहोचले आहे. तर चांदीचे भावही २,८०० ने उसळून विक्रमी १,२८,८०० रुपये प्रतिकिलो (सर्व करांसह) वर पोहोचले आहेत. मागील व्यवहारात चांदीचा दर १,२६,००० प्रतिकिलो होता. जागतिक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळण्यास सुरुवात केली आहे.
जळगावच्या सुवर्णबाजारपेठेत दर १ लाख १३ हजार १९७ रुपयांवर
जळगावच्या सुवर्णबाजारपेठेत सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा विक्रमी झेप घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेले दर मंगळवारी तब्बल १४४२ रुपयांनी वाढले. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे जीएसटीसह दर प्रति १० ग्रॅम १ लाख १३ हजार १९७ रुपयांवर पोहोचले. फक्त एका दिवसात दीड हजार रुपयांच्या आसपास वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
१ सप्टेंबर रोजी मध्ये २४ कॅरेट सोन्याचे जीएसटीसह दर प्रति १० ग्रॅम १ लाख ८ हजार ४५९ रुपये इतके होते. मात्र, त्यानंतर दररोजच्या चढ-उतारांमध्ये वाढीचाच कल दिसला. सोमवारी सोन्याचे दर १ लाख ११ हजार ७५५ रुपयांवर गेले होते. त्यानंतर मंगळवारी जवळपास दीड हजार रुपयांची भर पडून नवीन उच्चांक प्रस्थापित झाला. यामुळे १ ते ९ सप्टेंबर या कालावधीत सोन्याने तब्बल ४७३८ रुपयांची झेप घेतली आहे. दरवाढीमुळे बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या काहीशी घटल्याचे सराफ व्यावसायिक सांगतात. सोन्याचे दर प्रचंड वाढल्याने लहान प्रमाणातील ग्राहकांनी खरेदी टाळल्याचे चित्र दिसते. तरीदेखील, दरवाढीमुळे आर्थिक उलाढाल फारशी घटलेली नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण मोठ्या प्रमाणातील गुंतवणूकदार अजूनही सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत.
चांदीतदेखील मंगळवारी चढा-उतार दिसून आला. गेल्या आठवडाभरापासून स्थिर असलेले दर मंगळवारी १०३० रुपयांनी वाढले. त्यामुळे जीएसटीसह चांदीचे दर प्रति किलो १ लाख २९ हजार ७८० रुपयांपर्यंत पोहोचले. आठवडाभर स्थिर असलेली किंमत अचानक वाढल्याने चांदीची मागणी देखील काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, सोन्याचे भाव गगनाला भिडले असले तरी ग्रॅमने होणाऱ्या खरेदीत सुमारे ३० टक्के घट झाली आहे. परंतु, परंपरागत सण-उत्सवांचा हंगाम सुरू असल्याने सोने-चांदीच्या खरेदीला पूर्णविराम लागलेला नाही. दररोज नवे उच्चांक गाठणाऱ्या सोन्यामुळे ग्राहकांची मोठी परीक्षा सुरू आहे.
सोने आणि चांदीचे दर कोणत्या कारणांवर ठरतात?
सोने आणि चांदीचे दर दररोज ठरवले जातात आणि त्यामागे अनेक कारणे जबाबदार असतात. त्यामध्ये प्रमुखपणे खालील घटकांचा समावेश होतो :
* डॉलर-रुपया विनिमय दराचा प्रभाव
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदीचे भाव अमेरिकन डॉलरमध्ये ठरवले जातात. त्यामुळे डॉलरच्या किमतीत वाढ झाली किंवा रुपया कमजोर झाला, तर भारतात लगेच सोने महाग होते.
* आयात शुल्क आणि कर
भारतामध्ये वापरले जाणारे सोने बहुतांश प्रमाणात आयात केले जाते. त्यामुळे आयात शुल्क (Import Duty), जीएसटी आणि स्थानिक कर हे सोने-चांदीच्या दरावर थेट परिणाम करतात.
* जागतिक बाजारातील चढ-उतार
युद्ध, आर्थिक मंदी, व्याजदरांमध्ये बदल यांसारख्या जागतिक घडामोडींचा सरळ परिणाम सोन्यावर होतो. अशा अनिश्चित काळात गुंतवणूकदार शेअर्स किंवा इतर अस्थिर साधनांऐवजी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात.
* सांस्कृतिक आणि परंपरागत मागणी
भारतामध्ये सोने केवळ गुंतवणुकीसाठी नाही तर परंपरा आणि संस्कृतीशीही घट्ट जोडलेले आहे. विवाहसोहळे, सण-उत्सव आणि शुभ कार्यांमध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सोने-चांदीची मागणी जास्त राहते आणि त्याचा परिणाम किंमतींवर होतो.
* महागाई आणि सुरक्षित गुंतवणूक
महागाई वाढली किंवा शेअर बाजारात धोका निर्माण झाला की लोक सोन्यात गुंतवणूक करणे पसंत करतात. दीर्घकाळापासून सोने महागाईच्या तुलनेत सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा पर्याय मानला जातो. याच कारणांमुळे सोन्याची मागणी नेहमीच टिकून राहते आणि दर उच्चांक गाठत राहतात.