Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज-उद्धव भेटीत पहिला धमाका, महापालिका युतीची अधिकृत चर्चा, कोणकोणत्या मनपात युती?

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज-उद्धव भेटीत पहिला धमाका, महापालिका युतीची अधिकृत चर्चा, कोणकोणत्या मनपात युती?
By : | Edited By: Rohit Dhamnaskar | Updated at : 10 Sep 2025 01:23 PM (IST)

Raj Thackeray & Uddhav Thackeray: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. बुधवारी सकाळी कोणालाही पत्ता लागू न देता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे अचानक राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन पोहोचले. उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर जाईपर्यंत कोणालाही या गोष्टीचा फारसा पत्ता नव्हता. त्यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब हेदेखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले आहेत. तर मनसेकडून या बैठकीला संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर उपस्थित आहेत. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थवर येऊन गेले होते. त्यापूर्वी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला मातोश्रीवर गेले होते. मात्र, आज पहिल्यांदाच कोणता सण किंवा कार्यक्रम नसताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांसोबत त्यांचे खास शिलेदारही आहेत. गेल्या तासाभरापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही बैठक सुरु आहे. त्यामुळे ही भेट पूर्णपणे राजकीय स्वरुपाची मानली जात आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही भेट आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी असल्याचे सांगितले जाते. या भेटीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काय रणनीती असावी, याचा आराखडा निश्चित केला जाऊ शकतो. मनसे आणि ठाकरे गट कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार, याबाबतही बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आपली युती अधिकृतपणे कधी जाहीर करणार, याचा निर्णयही आजच्या बैठकीत होऊ शकतो. तसेच दोन्ही पक्षाच्या मुंबईतील काही नेत्यांना सुद्धा महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने जबाबदारी देण्यासंदर्भात आजच्या बैठकीत निर्णय होईल, अशी माहिती आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी (Raj Thackeray & Uddhav Thackeray Meeting)

5 जुलै 2025 - हिंदी सक्तीविरुद्ध मेळावा - राज आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर

27 जुलै - उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी मातोश्रीवर येऊन शुभेच्छा दिल्या

27 ऑगस्ट - गणेश चतुर्थीनिमित्त उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी

10 सप्टेंबर - उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर

आणखी वाचा

📚 Related News