बीड : सोलापूर जिल्ह्यातील गावात एका तरुणाने आपल्याच कारमध्ये बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. सुरुवातील आत्महत्या वाटणारी ही घटना हत्या आहे का, याबाबतचा अधिक तपास केला जात असून 21 वर्षीय नर्तिका पूजा गायकवाडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता, याप्रकरणी मृत गोविंद बर्गेच्या नातेवाईकांकडून नर्तिकेवर आरोप केले जात आहेत. तसेच, माझ्या मामाकडे पिस्तूल नव्हती, मामा निर्व्यसनी होता. त्यामुळे, या घटनेतून बदनाम करण्यात येत असल्याचंही मृत उपसरपंचाच्या भाचाने एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे.
च्या गेवराई तालुक्यातील लुकामसला गावातल्या उपसरपंचाने जिल्ह्यातील सासुरे गावात नर्तकीच्या घरासमोर आपल्या गाडीत बसून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याच समोर आलं. मात्र, हा घातपात असल्याचा आरोप उपसरपंचाच्या नातेवाईकांनी केलाय. माझे मामा निर्व्यसनी होते, त्यांच्याकडे पिस्तूल नव्हते, त्यांच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या टाकण्यात आल्या आहेत. हा घातपात असल्याचा संशय आणि आरोप उपसरपंचाच्या भाच्याने केला. मागील सहा महिन्यांपासून ते मानसिक तणावात होते. गेवराई येथील प्लॉट नावावर करून देणे अशी मागणी करुन त्या महिलेकडून ब्लॅकमेल केलं जात असल्याचं देखील यावेळी भाचाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे, गेल्या 6 महिन्याची हिस्ट्रीच भाचाने सांगितली आहे.
अलिशान घराची मागणी
हत्या प्रकरणानंतर त्यांची बदनामी केली जात असून राजकारणातल्या व्यक्तींनीच त्यांची ओळख महिलेसोबत करून दिली. केवळ पैसे काढण्यासाठी संबंध जुळवून देण्यात आले. त्यामुळे, आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी उपसरपंचाच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. दरम्यान, सोन्याच्या दागिन्यांसह लाख रुपयांचा मोबाईल उपसरपंचाने पूजा गायकवाड हिला गिफ्ट केला होता. याचवेळी नर्तकेकडून गेवराईतील एका आलिशान घराची मागणी केली जात होती. गेवराईमधील हेच घर या सरपंचाचे मृत्यूचे कारण ठरले का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, शहरातील माधवनगर भागात असलेल्या या घराची 10 दिवसांपूर्वीच वास्तुशांती झाली होती.
दीड वर्षांपूर्वी कला केंद्रात झाली ओळख
गोविंद बर्गे यांना कलाकेंद्रात जाण्याचा नाद होता. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड तणावात होते.