Vasai Crime News वसई : आजारपणाच्या विवंचनेतून हतबल झालेल्या 81 वर्षीय वृद्धाने पत्नीचा जीव (Crime News) घेऊन स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना वसईत घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर स्तब्ध झाला असून मानवी वेदनेचं भयावह रूप सर्वांसमोर आलं आहे.
वसईतील (Vasai Crime News) सांडोर गावातील करडीवाडी येथे राहणारे गॅब्रीयन परेरा (81) आणि त्यांची पत्नी आरपिना परेरा (74) आयुष्यभर एकमेकांचे सोबती होते. पण वृद्धापकाळात दोघेही गंभीर आजारांनी ग्रस्त झाले होते. गॅब्रीयन यांना कॅन्सरसारखा दुर्धर आजार होता, तर आरपिना दम्यासह सांधेदुखी, कंबरदुखी आणि म्हातारपणातील असंख्य आजारांनी व्याकुळ झाल्या होत्या. आरपिना शय्याग्रस्त होत्या आणि त्यांची देखभाल मुलगा, सुन आणि घरी ठेवलेली नर्स करत होती. तरीही आपल्या आजारामुळे मुलांना त्रास होत असल्याची भावना या वृद्ध दाम्पत्याच्या मनात सतत कुरतडत होती.
दरम्यान, शनिवारी रात्री गॅब्रीयन यांनी स्वयंपाकघरातील चाकू उचलला आणि पत्नी आरपिनाच्या गळ्यावर वार करून त्यांचा जीव घेतला. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर, पोटावर आणि मनगटावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घराबाहेर गेलेल्या मुलगा आणि सुना परत आल्यावर घर आतून बंद असल्याने त्यांनी दरवाजा तोडला. आतमध्ये आई रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आणि वडील गंभीर जखमी अवस्थेत पडलेले पाहून ते भयभीत आणि थक्क झाले.
मुलांचे ओझे कमी करण्यासाठी, वेदना संपवण्यासाठी टोकाचं पाऊल?
या घटनेची माहिती मिळताच, वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरपिनाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला, तर गंभीर जखमी गॅब्रीयन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गॅब्रीयन परेरा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीची स्थिती गंभीर असल्याने अटक अद्याप झालेली नाही. ही घटना केवळ गुन्हा नाही, तर वृद्धापकाळातील आजारपणाने त्रस्त झालेल्या मन:स्थितीचे दाहक दर्शन आहे. मुलांचे ओझे कमी करण्यासाठी, वेदना संपवण्यासाठी या दाम्पत्याने टोकाचा मार्ग निवडला. आणि वसईतली एक शांत गल्ली आज आयुष्याच्या असहाय्य शेवटाची साक्षीदार झाली.
आणखी वाचा