मुंबई : मराठमोळ्या बाईकरच्या जगभ्रमंतीच्या स्वप्नांना ब्रेक मिळाला असून धक्कादायक घटना घडली आहे. 1 मे रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भायंदर येथून माजी राज्यसभा खासदार विजयजी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ झालेल्या योगेश आलेकरी यांच्या 25 हजार किलोमीटरच्या ऐतिहासिक प्रवासाला अनपेक्षित अडथळा आला आहे. भारत, नेपाळ, चीन, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, रशिया, लाटविया, एस्टोनिया, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स, फ्रान्स आणि इंग्लंड अशा तब्बल 17 देशांतून प्रवास करत आलेकरी स्कॉटलंडच्या मार्गावर पोहोचले होते. मात्र, नॉटिंघॅममधील Wollaton Park परिसरातून त्यांची बाईक चोरी झाल्याने त्यांच्या पुढील प्रवासाला ब्रेक लागला आहे. विशेष म्हणजे, इंग्लंड पोलिसांकडूनही बाईकर योगेशला म्हणावे तसे सहकार्य मिळेना झाल्याची खंत त्याने बोलून दाखवली.
योगेश आलेकरी यांनी नॉटिंघॅममधील Wollaton Park परिसरात बाईक "पे अँड पार्क" मध्ये पार्क करून नाश्ता करत असतानाच त्यांची बाईक चोरीला गेली. केवळ बाईकच नव्हे तर प्रवासातील सर्व सामान देखील चोरीला गेले आहे. त्यामुळे, त्यांचा हा ऐतिहासिक प्रवास अचानक थांबला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, इंग्लंडचे पोलीस अपेक्षित सहकार्य करत नाहीत, असे योगेश आलेकरी यांनी सांगितले आहे. त्यामुळेच लवकरात लवकर आपली बाईक मिळावी यासाठी त्यांनी खुलेपणाने मदतीची विनंती केली आहे. दरम्यान, भारतीय दूतावासाने (Indian Embassy) तात्काळ सहकार्य करत नवीन पासपोर्ट उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर परदेशातील अनेक भारतीय नागरिकां तर्फेही आलेकरी यांना मोठी मदत केली जात आहे. मात्र, बाईक चोरीच्या धक्क्यामुळे 25 हजार किलोमीटरचा हा प्रवास सध्या थांबलेला आहे.
30 लाख खर्च, 25 देशांची भ्रमंती
गेल्या सहा-सात वर्षांपासून बाईकवरुन वेगवेगळे प्रवास करणाऱ्या योगेश आलेकरी या अनुभवी बाइकरने मुंबई ते लंडन असा थरारक प्रवास करण्याची आपली योजना सुरू केली होती. महाराष्ट्रातील गडकिल्ले बाईकरवरुन पालथे घालणारा योगेश आता जगातले तीन खंड आणि 24 देश त्याच्या बाईकवरून प्रवास करण्याचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज होता. योगेश आलेकरीचा हा प्रवास 25,000 किलोमीटरचा असून 100 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्याची त्यांची योजना आहे, 1 मे पासून म्हणजे दिनाच्या मुहूर्तावर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून तो या प्रवासाला सुरुवातही झाली.
आपल्या या मुंबई ते लंडन प्रवासाबद्दल बोलताना योगेशने म्हटले होते, “बहुतेक देशांना बाईकवरुन भेट दिल्यानंतर, बाईकवर जगाच्या सहलीला जाण्याचे माझे स्वप्न होते. त्या दिवसांत मला या दौऱ्याची कल्पना आली. हून लंडनला बाईकने जाण्याचा माझा प्लॅन आहे. या प्रवासादरम्यान, मी 24 देशांना भेट देईन आणि तीन खंड पार करेन आणि मी सुमारे 25,000 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या दौऱ्यासाठी मला 30 लाख रुपये खर्च येईल. मला वेगवेगळ्या देशांचा व्हिसा लागेल आणि माझी बाईक एअर कार्गोने पाठवली जाईल. या दौऱ्याच्या तयारीसाठी मी एक दिवसाचीही रजा घेतलेली नाही."