मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेले ठाकरे बंधू पुन्हा एकदा भेटले आहेत. आज (बुधवारी) सकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री अनिल परब उपस्थित होते, तर मनसेकडून संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर हे देखील आले होते. गेल्या पाऊण तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा सुरू असल्याचे समजते. मात्र, या चर्चेचा नेमका अजेंडा काय आहे, हे अधिकृतरीत्या अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही ठाकरे बंधूंच्या अशा सलग होत असलेल्या भेटींमुळे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या शक्यतांना अधिक बळ मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे बंधूंमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
या विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता
दोन्ही पक्षांच्या युतीबाबत ही बैठक झाली असल्याची शक्यता आहे. ही बैठक आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याबद्दल झाल्याची माहिती आहे आणि त्याबाबत चर्चा देखील झाल्याचे बोललं जात आहे. त्याचबरोबर दसरा मेळाव्याबाबत देखील चर्चा झाल्याची दुसरी शक्यता वर्तवली जात आहे. दसरा मेळाव्याला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा आहे. या दसरा मेळाव्याला राज ठाकरे देखील उपस्थित राहतील का यासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसबरोबर किंवा महाविकास आघाडी बरोबर राज ठाकरे जाणार का? त्यांना महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं का? या संदर्भात देखील चर्चा झाली असल्याची माहिती आहे. काल उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेत्यांसोबत बैठक झाली होती, त्यानंतर आता काँग्रेस पक्ष श्रेष्ठी जवळ याबाबतचा प्रस्ताव ठेवला जाईल आणि मग मनसे काँग्रेस बरोबर किंवा महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांची मनसे सामील होणार का? हा निर्णय तो पक्षश्रेष्ठी आणि शरद पवार त्याचबरोबर उद्धव ठाकरे घेणार आहेत, या निर्णयावर देखील आजच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे हे फक्त ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करतात की, महाविकास आघाडीत ते सहभागी होतात, आणि जर महानगरपालिकेबद्दल असेल तर फक्त मुंबई महानगरपालिकेपुरतं दोन्ही पक्ष एकत्र येतात की, पूर्ण ामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत, या संदर्भात देखील आजच्या बैठक चर्चा झालेली आहे. या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर दुसरी फळी एक ठरवण्यात येईल. पहिल्या चर्चेनंतर दुसऱ्या फळीची चर्चा होईल. त्यामध्ये संजय राऊत, अनिल परब, बाळा नांदगावकर, हे सर्वजण मिळून सहभागी होतील. याबाबत विस्तृतपणे अभ्यास केला जाईल. त्यानंतर कोणत्या पक्षाची ताकद कुठे आहे? दोन्ही पक्षांची ताकद सेम असेल त्या ठिकाणी काही निर्णय घ्यायचे, मध्ये दादर परिसरात माहीम परिसर आहे, या ठिकाणी ठाकरे गटाचे आणि मनसे पक्षाची ताकद सेम आहे. मग त्या ठिकाणी निर्णय काय घ्यायचे ते मुद्दे आहेत. त्यावर येत्या काळामध्ये निर्णय घेतला जाईल. त्यासाठी चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी स्थानिक पातळीवरील नेते बसतील किंवा दुसऱ्या फळीतील नेते बसतील. मात्र दोन सर्वोच्च नेते आज एकत्र आले आणि त्यांनी चर्चा केली, त्या चर्चानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या संदर्भामध्ये दसरा मेळाव्यामध्ये काही सुतोवाच होतात का? किंवा दसरा मेळाव्यात याबद्दल घोषणा केली जाते का? हे पाहणं सर्वात महत्त्वाचं असणार आहे.
मनसे शिवसेनेची युती झाली तर मग महाविकास आघाडीचे काय होणार ?
* राज ठाकरे यांना सोबत घेण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा मात्र काँग्रेस नेते दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची चर्चा केल्यावरच राज ठाकरे संदर्भातला निर्णय घेणार.
* शिवसेना आणि मनसे युती झाल्यास दोन बंधू एकत्र निवडणुका लढणार.
* काही महापालिकांमध्ये शिवसेना महाविकास आघाडी सोबत आघाडी केली जाईल तर काही ठिकाणी मनसेसोबत तर काही ठिकाणी स्वबळाचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो.
* स्थानिक पातळीवरील नेते पदाधिकाऱ्यांचा मत लक्षात घेऊन मनसे सोबत युती आणि महाविकास आघाडी सोबत आघाडी करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार असेल.