बीड : राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या बीडच्या कारागृहातील जेलरचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. जेलर पेट्रस गायकवाड यांनी कारागृहाच्या परिसरातील जुन्या झाडांची कत्तल केली. ती झाडे कापताना कुणाचीही परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे. त्याचसोबत त्यांनी एका कैद्याकडून स्वतःच्या मालकीची कार धुऊन घेतल्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड त्याच्या साथीदारांसह बीडच्या कारागृहात आहे. मात्र सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून बीडचे कारागृह अधीक्षक वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. आतापर्यंत कैद्यांच्या अनाठाई पराक्रमामुळे बीडचे जेल चर्चेत होतं. आता मात्र कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्या कारणाम्यामुळे बीडचे जेल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
बीडमध्ये एकीकडे गणपतीचे विसर्जन होत असताना दुसरीकडे बीड कारागृहाचे जेलर पेट्रस गायकवाड यांच्या आदेशानं कारागृह परिसरातील 30 ते 40 वर्षांपूर्वीच्या झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र हीच बाब सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच तोडलेल्या झाडांची वाहतूक करणारा टेम्पो थेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यामुळे बीडचे कारागृह आणि जेलर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
या प्रकरणाची चर्चा संपत नाही तोच एका कैद्याकडून गायकवाड यांच्या खासगी मालकीची गाडी धुऊन घेतानाचा एक व्हिडीओ समोर आला. त्यामुळे बीडच्या कारागृहात नेमकं चाललय काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
वृक्ष कत्तलीची वरिष्ठ पातळीवर दखल
बीडच्या कारागृह परिसरातील वृक्ष कत्तलीची गंभीर दखल कारागृह महासंचालकांकडून देखील घेण्यात आली. उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यात वृक्ष संवर्धनाची चळवळ गतिमान केली जात आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर वृक्षारोपण करत झाडं जोपासण्याचा संदेश दिला. तर दुसरीकडे कारागृहामध्येच झाडांच्या कत्तली सुरू आहेत. कारागृहातील या वृक्षतोडी संदर्भात माहिती घेतली असून त्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
अधीक्षकांची वादग्रस्त कारकिर्द
कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड आणि वाद हे काही नवं नाही. यापूर्वी ात गायकवाड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. आता बीडच्या जेलमध्ये वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट, सतीश भोसले उर्फ खोक्याकडे आढळून आलेला गांजा, त्यानंतर झाडांची कत्तल आणि आता खासगी गाडीची धुलाई एका कैद्याकडून करून घेणे, या कारणांमुळे पुन्हा एकदा पेट्रस गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
प्रशासनावर पकड असलेले अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत. तर याच बीडच्या कारागृहात राज्यात गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. त्यामुळे प्रशासनाला न झुगारणाऱ्या जेलरवर अजितदादा काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.
ही बातमी वाचा: