Beed Crime Ex deputy sarpanch death: शेवटच्या पाच-सहा दिवसांत काय घडलं, गोविंद बर्गेंचा मोबाईल बंद, गावातील मित्रांनी काय सांगितलं?

Beed Crime Ex deputy sarpanch death: शेवटच्या पाच-सहा दिवसांत काय घडलं, गोविंद बर्गेंचा मोबाईल बंद, गावातील मित्रांनी काय सांगितलं?
By : | Edited By: Ankita Khane | Updated at : 11 Sep 2025 09:39 AM (IST)

: गेवराई तालुक्यातील लुखमसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे (३४) यांच्या आत्महत्येप्रकरणी सासुरे (ता. बार्शी) येथील कला केंद्रातील नर्तिका पूजा देवीदास गायकवाड (२१) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी सासुरे गावातच गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या गाडीतून स्वतःच्या पिस्तुलाने गोळी झाडून जीवन संपवलं. या घटनेनंतर वैराग पोलिसांनी आत्महत्येत वापरलेल्या पिस्तुलाचा तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवालानंतर तपासाची दिशा ठरणार आहे. दरम्यान या घटनेच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. गोविंद बर्गे यांनी आपल्या मित्रासोबत होणार त्रास व्यक्त केला होता अशी माहिती देखील समोर आली आहे.

पूजाकडून मिळणाऱ्या धमक्या आणि सततच्या पैशांच्या तगाद्यामुळे गोविंद मानसिकदृष्ट्या खचला होता. घटनेपूर्वी गोविंदने आपल्या मित्राला चंद्रकांत शिंदे याच्याशीही मन मोकळं करत "मी खूप निराश झालो आहे" असं सांगितलं होतं. गोविंदने पूजाला स्वतःचे कला केंद्र सुरू करण्यासाठी सुमारे आठ लाख रुपये दिले होते. त्याचबरोबर सासुरे गावातील घर बांधण्यासाठीही आर्थिक मदत केली होती. तिचे सर्व हट्ट तो पूर्ण करत होता, मात्र तिच्या मागण्या वाढत होत्या अशी माहिती आहे, तिला गेवराईतील घर देखील तिच्या नावावरती करून हवं होतं, अशी माहिती आहे. दरम्यान, यामध्ये घातपाताची शक्यता काही नातेवाइकांनी व्यक्त केली असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मागील पाच ते सहा दिवसांपासून ते अधिक तणावात; मोबाईल बंद होता
मात्र माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मित्र परिवारांनी शंका उपस्थित करत या प्रकरणाची योग्य चौकशीची मागणी केली. गोविंद बर्गे आत्महत्या करतील असं वाटत नाही. आम्ही रोज त्यांच्यासोबत होतो. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून उपसरपंच गोविंद बर्गे मानसिक तणावात होते. मागील पाच ते सहा दिवसांपासून ते अधिक तणावात होते. त्यांचा मोबाईल बंद होता. अशी माहिती त्यांच्या मित्र परिवारांना दिली. घटनेच्या ठिकाणी गेलो असता तेथे एक बाब निदर्शनास आली. मानसिक तणावाखाली येऊन ही घटना झाली. मागील पाच ते सहा दिवसांपासून त्यांचा कुणाशीही संपर्क नव्हता. त्यांचा फोनही लागत नव्हता. आणि त्यांचा कुणाशीही संवाद नव्हता. त्यामुळे आमच्या असं लक्षात येत हा घात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी गोविंद बर्गे यांच्या मित्र परिवाराने केली.

फिर्यादीतील आरोप

बर्गे यांचे नातेवाइक लक्ष्मण चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गोविंद आणि पूजा गायकवाड यांची ओळख २०२४ मध्ये तुळजाभवानी कला केंद्र, पारगाव येथे झाली होती. ही ओळख पुढे प्रेमसंबंधात बदलली. मात्र, पूजाने वारंवार गोविंदकडे पैशांची मागणी केली. त्यासाठी त्याने तिला महागडे मोबाइल, बुलेट मोटारसायकल, सोने-नाणी, तसेच नातेवाइकांच्या नावावर प्लॉट आणि शेतजमीन खरेदी करून दिली. याशिवाय गेवराईतील नवीन घर नावावर न केल्यास "बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन" अशी धमकी पूजा देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Govind Barge Murder Case: नेमकं प्रकरण काय?

गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता. ते अनेक कला केंद्रात जायचे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही काही जमीन केली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले गेले होते. प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले होते.

गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते. मात्र, ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुरे येथील घरी आले होते. याठिकाणी दोघांमध्ये नेमके काय झाले, हे माहिती नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला. कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता. त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात कानशिलात गोळी झाडून घेतल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. गोविंद बर्गे यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरुन डाव्या बाजूने बाहेर पडली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

📚 Related News