Nepal Gen Z Protest: नेपाळ मोठ्या राजकीय उलथापालथीमधून जात आहे. राजधानी काठमांडूमध्ये Gen-Z रस्त्यावर उतरून सरकारविरोधात उग्र आंदोलन करत आहेत. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली आहे की संपूर्ण नेपाळमध्ये अस्थिरतेचं वातावरण आहे. एक दिवस आधी संसद भवनावर हल्ला झाल्यानंतर आक्रमक तरुणांनी पंतप्रधान केपी ओली यांच्या निवासस्थानावरही हल्ला चढवला. त्यानंतर पंतप्रधान ओली यांना राजीनामा द्यावा लागला आहे. अशीही अफवा आहे की ओली कधीही देश सोडू शकतात.
याचदरम्यान लोकांचं लक्ष नेपाळच्या सामाजिक आणि धार्मिक संरचनेकडेही गेलं आहे. विशेषतः हा प्रश्न समोर आला आहे की नेपाळमध्ये किती हिंदू आणि किती मुस्लिम आहेत. त्यांची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिती कशी आहे. तर चला जाणून घेऊया की नेपाळमध्ये किती हिंदू आणि मुस्लिम राहतात, त्यांची संख्या किती आहे आणि समाजात त्यांचं स्थान काय आहे.
नेपाळमध्ये किती हिंदू आणि किती मुस्लिम?
नेपाळच्या 2021 च्या जनगणनेनुसार देशाची एकूण लोकसंख्या सुमारे 2.97 कोटी आहे, ज्यामध्ये 81.19 टक्के लोक हिंदू आहेत. म्हणजेच जवळपास 2 कोटी 36 लाख लोक हिंदू धर्माचे पालन करतात. नेपाळ कधीकाळी जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होतं, पण आता ते धर्मनिरपेक्ष देश झालं आहे. मात्र 2011 च्या तुलनेत हिंदू लोकसंख्येत किंचित घट झाली आहे.
तर नेपाळमध्ये मुस्लिम हे तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं धार्मिक समुदाय आहे. 2021 च्या जनगणनेनुसार 5.09 टक्के लोक मुस्लिम आहेत. म्हणजेच जवळपास 14 लाख 83 हजार लोक इस्लाम धर्माचे पालन करतात. 2011 मध्ये ही संख्या 4.4 टक्के होती, जी आता वाढून 5.09 टक्के झाली आहे. म्हणजेच 0.69 टक्क्यांची वाढ झाली आहे. नेपाळमधील बहुतांश मुसलमान सुन्नी असून ते प्रामुख्याने तराई प्रदेशात राहतात, जो भारताच्या सीमेजवळील भाग आहे. मुस्लिमांची 95 टक्के लोकसंख्या याच भागात राहते.
नेपाळमधील इतर धर्मीयांची लोकसंख्या
नेपाळमध्ये बौद्ध धर्म हा दुसरा मोठा धर्म आहे. भगवान बुद्धांचा जन्म नेपाळात झाल्यामुळे इथे बौद्ध धर्माचं मोठं महत्त्व आहे. एकूण लोकसंख्येपैकी 8.2 टक्के लोक बौद्ध धर्माचे आहेत. त्यांची संख्या सुमारे 23 लाख 94 हजार आहे. मात्र गेल्या काही वर्षांत बौद्ध लोकसंख्येत 0.79 टक्क्यांनी घट झाली आहे. याशिवाय किरात धर्म हा नेपाळच्या स्थानिक आदिवासी समुदायांमध्ये प्रचलित आहे. जनगणनेनुसार याचा वाटा सुमारे 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे. पण या धर्मात 0.17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नेपाळमध्ये ख्रिश्चन धर्माचे अनुयायी अद्याप खूप कमी आहेत. पण मागच्या दशकात त्यांची संख्या 0.36 टक्क्यांनी वाढली आहे.