Kolhapur News: ऑनलाईन रमीत पैशाची उधळण केल्याने कर्जबाजारी झाल्याने दोघा मित्रांनी दागिने चोरण्याचा कट केला. यावेळी अंगावरील दागिने चोरताना प्रतिकार करणाऱ्या वृद्ध महिलेचा खून करून मृतदेह गोबरगॅसमध्ये टाकणाऱ्या दोघा मित्रांना कोल्हापूर एलसीबीच्या पोलिसांनी गजाआड केलं. अभिजित मारुती पाटील आणि कपिल भगवान पातळे अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
कर्ज फेडण्यासाठी खुनाचा कट रचला
या दोघांनी ऑनलाइन रम्मीत पैशाची उधळण केल्याने कर्जबाजारी झाले होते. दोघांवर लाखो रुपयांचं कर्ज झालं होतं. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी या मित्रांनी गावातीलच 73 वर्षीय श्रीमंती रेवडेकर या महिलेचं दागिने चोरण्याचा कट केला आणि त्यासाठी दिवसही ठरला. अनंत चतुर्थी दिवशी गावात गणेश विसर्जन मिरवणुका आणि घरात एकटी महिला असल्याची संधी साधून तिच्या अंगावरील दागिन्यांवर डल्ला मारला. परंतु, रेवडेकर यांनी प्रतिकार केल्याने तिच्या डोक्यात वार करून तिचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह गोबर गॅसमध्ये टाकून दागिने घेवून त्यांनी पलायन केलं.
दोघांनी खुनाची कबुली दिली
या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस आणि राधानगरी पोलीसांनी समांतर तपास सुरू केला. दरम्यान, या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपीनीय माहितीनुसार पोलिसांनी गावातीलच अभिजित पाटील आणि कपिल पातळे यांना अटक केली. पोलीस चौकशीत या दोघांनी रेवडेकर यांच्या खूनाची कबुली दिली.
इतर महत्वाच्या बातम्या