MNS Leader Ameya Khopkar Warns Comedian Kapil Sharma: 'बॉम्बे' नाही, 'मुंबई' म्हणा...; कॉमेडियन कपिल शर्माला मनसे नेते अमेय खोपकरांचा इशारा, घडलंय काय?

MNS Leader Ameya Khopkar Warns Comedian Kapil Sharma: 'बॉम्बे' नाही, 'मुंबई' म्हणा...; कॉमेडियन कपिल शर्माला मनसे नेते अमेय खोपकरांचा इशारा, घडलंय काय?
By : | Updated at : 11 Sep 2025 02:51 PM (IST)

MNS Leader Ameya Khopkar Warns Comedian Kapil Sharma: कित्येक वर्षांपूर्वीच 'बॉम्बे' (Bombay) हे अधिकृत नाव बदलून 'मुंबई' (Mumbai) करण्यात आलं आहे. तरीसुद्धा टेलिव्हिजन विश्वातील सुप्रसिद्ध कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) अजूनही 'बॉम्बे' असाच उल्लेख केला जात आहे. आता याचप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (Maharashtra Navnirman Sena) आक्षेप घेतला आहे. मनसे नेते अमेय खोपकर (MNS Leader Amey Khopkar) यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्यांची पोस्ट सध्या चर्चेत आहे.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

मनसे नेते अमेय खोपकर आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणालेत की, "बॉम्बेचं मुंबई अधिकृत नामकरण होऊन 30 वर्ष झाली तरी अजूनही बॉलिवूडमधील कपिल शर्मा शो यात सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. 1995 महाराष्ट्र शासन व 1996 मध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई, बेंगळुरू, कोलकाताच्याही आधी मुंबई झाले आहे. तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा हा विनंती वजा इशारा देण्यात येत आहे."

आपल्या पोस्टसोबतच अमेय खोपकर यांनी हुमा कुरेशी, साकिब सलीम, शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी यांची एक क्लिप शेअर केली आहे. हे सर्व स्टार्स 'द कपिल शर्मा शो'मध्ये आले होते, त्या एपिसोडची ही क्लिप आहे. या एपिसोडमध्ये बोलताना बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तिचा मुंबईत आल्यानंतरचा स्ट्रगल सांगताना मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

'द कपिल शर्मा शो' काय स्पष्टीकरण देणार?

मनसे नेत्याच्या या पोस्टमुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मनसे नेत्याच्या इशाऱ्यानंतर कपिल शर्माच्या टीमकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. कपिल शर्मा आणि टीम काय स्पष्टीकरण देणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मनसेच्या आवाहनानंतर बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील सेलिब्रिटी काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, मनसेनं उचललेला हा मुद्दा आगामी महानगरपालिका निवडणुकांशीही जोडला जात आहे. त्यामुळेच या मुद्द्यावर आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर याचे वेगवेगळे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

📚 Related News