Solapur Rain : सोलापूर शहर व परिसरात रात्रभर विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शहरातील व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. (Solapur Rain News)
शहरातील भाग जलमय
रात्रीच्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल, मित्र नगर, शेळगी या भागांमध्ये पाणी घरात घुसल्याने स्थानिक नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक घरांमध्ये 2-3 फूटपर्यंत पाणी घुसल्याचे दृश्य पाहायला मिळाले. शहरातील मुख्य रस्ते, विशेषतः सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील पंजवानी मार्केटसमोर महामार्गांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. सर्व्हिस रोडने प्रवास करणाऱ्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे पाहायला मिळाले.
नागरिकांच्या घरात शिरलं दुर्गंधीयुक्त पाणी
शहरातील 256 गाळा परिसरात पाणी शिरले आहे. ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात घुसले, त्यामुळे अनेकांना रात्रभर जागून काढावी लागली. सध्या महानगरपालिकेचे कर्मचारी ड्रेनेज सफाईचे काम करताना या परिसरात दिसून येत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बसे स्वतः फिल्डवर उतरले आहेत. मित्रनगर शेळगी भागात स्वतः आयुक्त ओम्बसे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पाहणी करत आहेत. दरम्यान, सोलापूर शहरात मागील 24 तासात 118.3 मिमी पावसाचे नोंद झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार काल 8.30 ते आज 8.30 पर्यंत 118.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ग्रामीण भागातही जोरदार पावसाचा फटका
शहरासह अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द, सांगवी बुद्रुक, चपाळगाव, चुंगी या गावांमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाची नोंद झाली. जुलै-ऑगस्टमध्ये आधीच भरून वाहणारे ओढे-नाले रात्रीच्या पावसामुळे ओव्हरफ्लो झाले आहेत.
बोरी प्रकल्पातून विसर्ग वाढवला
अक्कलकोट तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्पातून सकाळी 6:00 वाजता 4000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याआधी हा विसर्ग 1500 क्युसेक होता. त्यामुळे बोरी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना नदीजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही पुलावरून पाणी वाहत असताना तो ओलांडणे टाळावे, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
शिरवळवाडी तलावाचा सांडवा ओव्हरफ्लो
शिरवळवाडी ल.पा. तलावातून अनियंत्रित विसर्ग सुरू असून त्यामुळे शिरवळ ते वागदरी रस्ता पूर्णतः बंद झाला आहे. स्थानिक ग्रामपंचायती, पोलीस पाटील व नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे .
इतर महत्त्वाच्या बातम्या