Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं अन् फरफटत नेलं; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी, सहा जण जखमी

Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं अन् फरफटत नेलं; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी, सहा जण जखमी
By : | Updated at : 11 Sep 2025 08:37 AM (IST)

जुन्नर : जुन्नरमध्ये वाढदिवसानिमित्त आयोजित शोभायात्रेत डीजे वाहनाच्या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शोभायात्रेत डीजे वाहनाच्या अपघातात ढोलताशा पथकातील आदित्य सुरेश काळे (वय 21) या युवकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना काल (बुधवारी दि.10) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जुन्नरमध्ये घडली. याप्रकरणी आयोजक देवराम लांडे, अमोल लांडे, डीजे मालक सौरभ शेखरे आणि चालक नामदेव रोकडे यांच्यावर जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, देवराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्नर शहरात बुधवारी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत डीजे वाहन, ढोल-ताशा पथक आणि गोफनृत्य पथक सहभागी झाले होते. खामगावजवळील शिवेचीवाडी येथील आदिवासी ठाकर समाजाच्या मुक्तादेवी तरुण मंडळाचे ढोल-ताशा पथक देखील या शोभायात्रेत सहभागी होते. शोभायात्रा जुन्नर बाजार समितीतून धान्य बाजाराकडे येत असताना उतारावरती असतानाच डीजे वाहन ढोल-ताशा पथकातील युवकांच्या अंगावर आले. वाद्याच्या आवाजामुळे काहींना वाहन येत असल्याचं समजलं नाही. त्यामुळे आदित्य काळेला डीजे वाहनाने फरफटत नेलं, तर गोविंद काळे, विजय केदारी, सागर केदारी, बाळू काळे आणि किशोर घोगरे हे या घटनेमध्ये जखमी झाले आहेत.

परिवारात एकुलता एक मुलगा

डीजे वाहन पुढे जाऊन बाजार समितीच्या प्रवेशद्वारातील वॉचमनच्या खोलीवर जाऊन आदळले. उपचारादरम्यान आदित्य काळे याचा मृत्यू झाला. आदित्य हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता. तो परिवारात एकुलता एक मुलगा असून, त्याचे वडील सुरेश काळे हे खामगावचे माजी उपसरपंच आहेत. त्याची आई-वडील मोलमजुरी करतात. आदित्यच्या मृत्यूनंतर संतप्त आदिवासी ठाकर समाजबांधवांनी जुन्नर पोलीस ठाण्यात आयोजक आणि डीजे वाहनचालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करत धरणे आंदोलन केले.

तपास सुरू

पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, वाहनाचे ब्रेक नादुरुस्त झाले किंवा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले याबाबत तपास सुरू आहे. बंदी असलेल्या डीजे वाहनाचा शोभायात्रेत समावेश का करण्यात आला? शोभायात्रेसाठी आणि वाद्य वाजंत्र्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली होती का? याबाबत चौकशीची मागणी होत आहे. तसेच, डीजे वाहनाचा परिवहन विभागाचा परवाना आणि वाहन रस्त्यावर चालवण्यास योग्य आहे का, याची तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे. जुन्या वाहनांत बदल करून डीजे वाहन तयार केले जाते, याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करते, असा आरोप होत आहे.

📚 Related News