Tulsi Vivah 2025 :हिंदू पंचांगानुसार, यंदा 2 नोव्हेंबर 2025 रोजी तुळशी विवाह साजरा केला जाणार आहे. पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादश तिथीला तुळशी विवाह साजरा करतात. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने यंदाचा तुळशी विवाह फार खास मानला जाणार आहे. कारण, या दिवशी शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. हा ग्रह तूळ राशीत असणार आहे.
शुक्र ग्रहाचं तूळ राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे तुळशी विवाहाच्या दिवशी शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. मालव्य राजयोगाचं महत्त्व मालव्य राजयोग हा पंच महापुरुष योगांपैकी एक अत्यंत शुभ योग मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार सौंदर्य, प्रेम, भौतिक सुख, कला आणि समृद्धीचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाच्या विशिष्ट स्थितीमुळे हा योग तयार होतो. जेव्हा शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ किंवा तूळ राशीत किंवा आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत असतो आणि तो केंद्रस्थानी स्थित असतो, तेव्हा हा योग तयार होतो.
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार होतो, त्यांना देवी लक्ष्मीची विशेष कृपा लाभते. अशा व्यक्ती जीवनात प्रचंड धन-संपदा, ऐश्वर्य, उच्च शिक्षण, आकर्षक व्यक्तिमत्त्व, कला आणि विलासी जीवन अनुभवतात. मालव्य राजयोगामुळे प्रेम संबंधांमध्ये स्थिरता येते आणि दांपत्य जीवन सुखी होते. कन्या रास (Virgo Horoscope) शुक्र ग्रहाचं संक्रमण कन्या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. या दिवशी तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
ज्या लोकांच्या नात्यात तणाव सुरु होता तो आता हळुहळू कमी होईल. नात्यात गोडवा निर्माण झालेला दिसेल. तसेच, या काळात तुम्ही काही शुभ निर्णय देखील घेऊ शकता. तुमच्या आयुष्यात सुख शांती नांदेल. तूळ रास (Libra Horoscope) शुक्र ग्रहाचं संक्रमण तूळ राशीसाठी फार लाभदायी ठरणार आहे.
तुमचे जुने गैरसमज दूर होतील. तसेच, या काळात तुम्ही एखाद्या नवीन वस्तूची देखील खरेदी करु शकता. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. तसेच, तुमच्या वाणीत गोडवा निर्माण होईल. या काळात तुमचं घर आणि करिअर दोघांमध्ये स्थिरता दिसून येईल.
मीन रास (Pisces Horoscope) शुक्र ग्रहाचं संक्रमण मीन राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या काळात अनेक प्रवासाचे योग जुळून येतील. नवीन अनुभवांतून तुम्हाला खूप काही शिकता येईल. तुमचं प्रेम जीवन चांगलं राहील. तसेच, ग्रहांच्या शुभ संक्रमणामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल.
तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ).








