Beed Crime:बीड जिल्ह्यात गुन्हेगारी काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. किरकोळ कारणावरून होणाऱ्या मारहाणीचा घटना, कौटुंबिक वादातून होणाऱ्या हत्या, लाठ्या काठ्या, कोयते, सत्तूर अशा शस्त्रांचा सर्रास होणारा वापर या शहरात नवा राहिला नाही. दरम्यान, बीडच्या परळी तालुक्यातील हेळंब गावामध्ये एकदा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भावकीतील लोकांनी घरात घुसून पित्यासह त्याच्या तीन मुलांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच कुटुंबातील एका मुलीला विष पाजलं.
बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. (Crime News) या घटनेचा थरारक व्हिडिओ आता समोर आलाय. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र त्यांना पोलिसांनीही दाद दिली नाही. कुटुंबीय पोलीस अधीक्षकांकडे गेले. तिथून त्यांना अंबाजोगाईला जाऊन निवेदन द्या असे सांगण्यात आले.
या पीडित कुटुंबाने आता थेट पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आर्त हाक दिली असून आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे. Beed Crime:नेमके घडले काय ? परळी तालुक्यातील हेळंब गावात घडलेल्या एका थरारक घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. भावकीतील काही लोकांनी एकाच कुटुंबावर घरात घुसून जीवघेणा हल्ला केला. लाठ्या, काठ्या, दांडक्यांनी बेदम मारहाण करत वडिलांसह तीन मुलांना गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी त्या कुटुंबातील मुलीला विष पाजल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.
मारहाण झालेल्या पित्याने सांगितले, ' मारहाण केलेल्या लोकांवर याआधीच छेडछाड, मारहाण अंतर्गत एक केस दाखल केलेली आहे. दाखल केलेली केस मागे घे नाहीतर जीवे मारतो असं म्हणत कुऱ्हाडीचा दांड्याने, काठ्यांनी मला व माझ्या मुलांना मारहाण करत बेशुद्ध केलं. एका मुलीलाही बेदम मारहाण करत बेशुद्ध केलं. व दुसऱ्या मुलीला विष पाजलं. गावातील दोन चार लोकांनी दवाखान्यात आणलं.
आधी पोलीस ठाण्यात नेलं त्यानंतर दवाखान्यात घेऊन जा म्हटले. पोलीस ठाण्यातून फोन आला आंबेजोगाईला जा. ' या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ ही समोर आला आहे. या व्हिडिओत चार-पाच जण पीडित वडील वासुदेव आंधळे यांना बेदम मारहाण करत आहेत. वडिलांना सोडवायला मध्ये पडलेल्या मुलीला एकजण ढकलतो.
तिच्या मागे पळतो. तिला बेदम मारहाण करताना दिसतोय. ही घटना घडत असताना कुटुंबातील लोकांच्या किंकाळ्यांनी परिसर अक्षरशः हादरला आहे ही घटना इतकी भीषण होती की मारहाण झाल्यानंतर वडील आणि मुलं सर्वजण बेशुद्ध पडले. आरोपी मात्र घटनास्थळावरून फरार झाले. या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
या घटनेनंतर पीडित कुटुंबाने ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली, मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली. शेवटी वडील वसुदेव विक्रम आंधळे यांनी न्याय मिळावा म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. तिथून मात्र “अंबाजोगाईला जाऊन निवेदन द्या” असं सांगण्यात आलं. निराश झालेल्या या वडिलांनी आता थेट पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे न्यायाची आर्त हाक दिली आहे. लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी हॉटेल कामगाराला बेदम मारहाण दुसरीकडे, बीड शहरातही गुंडांच्या दहशतीचा कहर सुरूच आहे.
शहरातील एका हॉटेलवर किरकोळ कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने हल्ला चढवला. या गुंडांनी लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी हॉटेल कामगाराला निर्दयपणे मारहाण केली. यात त्या कामगाराचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात करण पवार, दिलीप पवार आणि अभिषेक खाडे या तीन आरोपींविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, यापूर्वीही त्यांनी अनेक ठिकाणी दहशत माजवली होती.
पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. बीड जिल्ह्यातील सलग वाढणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बीड शहरातील घटनेनं कायदा-सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीचं पुन्हा एकदा समोर येत आहे. नागरिकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची मागणी जिल्हाभरातून होत आहे. हेही वाचा.








