South Africa beat Pakistan by 55 runs in 1st T20I : रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेने अशी अप्रतिम कामगिरी केली, जे आजवर कोणत्याही संघाला जमली नव्हती. पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 55 धावांनी शानदार विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विशेष म्हणजे, रावळपिंडीच्या टी20 आंतरराष्ट्रीय इतिहासात ही पहिलीच वेळ होती, जेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सामना जिंकला. खरंतर दिग्गजांनी सजलेल्या पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकाच्या सी टीमने पराभव केला. 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 गडी गमावून 194 धावा केल्या.
संघाकडून सलामीवीर रीजा हेंड्रिक्सने 40 चेंडूत 60 धावांची दमदार खेळी साकारली, ज्यात 5 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. अखेरच्या टप्प्यात जॉर्ज लिंडेने 22 चेंडूत 36 धावा झटपट फटकावत संघाचा स्कोर जवळपास 200 वर नेला. शाहीन आफ्रिदीला दक्षिण आफ्रिकाने चांगलाच धुतला, त्याला 4 षटकांत 45 धावा ठोकल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव कोसळला. संपूर्ण संघ 18.
1 षटकांत केवळ 136 धावांवर गारद झाला. सॅम अय्यूब (37) आणि मोहम्मद नवाज (36) यांनी थोडा प्रतिकार केला, पण इतर फलंदाज फ्लॉप ठरले. पाकिस्तानकडून फक्त चार फलंदाजच दुहेरी आकड्यात पोहोचू शकले. बाबरची बॅट कामगिरी करण्यात अपयशी ठरली आणि तो क्रीजवर आल्यापासून पाच मिनिटांतच बाद झाला. बाबर आझम शून्यावर बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. कॉर्बिन बॉशने धारदार मारा करत 4 बळी घेतले, तर जॉर्ज लिंडेने सर्वांगीण प्रदर्शन करत गोलंदाजीमध्येही चमक दाखवली. त्याने 3 षटकांत 31 धावा देत 3 बळी घेतले. लिझाड विलियम्सने 2 आणि लुंगी एन्गिडीने 1 विकेट घेतली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने केवळ मालिकेत आघाडी घेतली नाही, तर रावळपिंडीच्या इतिहासात प्रथम फलंदाजी करून जिंकणारा पहिला संघ ठरण्याचा मानही मिळवला.
मालिकेतील दुसरा सामना 31 ऑक्टोबर रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाणार आहे, जिथे पाकिस्तानचा संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल.








